Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्तिमत्व । ११३

तें वाचन, अवश्य तो व्यासंग, त्यांनी केला होता. या दृष्टीने इतिहास हा त्यांच्या व्यासंगाचा प्रधान विषय होता. वक्तृत्व, संपत्तीचा उपभोग, गर्व, मुद्रण-स्वातंत्र्य, लोकभ्रम, आमच्या देशाची स्थिति- कोणताहि विषय असो. ग्रीस, रोम, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया, अमेरिका या देशांच्या व प्राचीन भारत व महाराष्ट्र यांच्या इतिहासांतील आधार-प्रमाणे देऊन ते उपपादन करतात. हे इतिहास मात्र त्यांनी फार बारकाईने वाचले होते. त्यांतील घटना व व्यक्ति त्यांच्या डोळ्यांपुढे सतत उभ्या असत आणि विषय निघतांच तेथे तेथे त्यांची गंफण ते करीत असत. त्यामुळे त्यांची निबंधमाला रत्नजडित मालेप्रमाणे शोभिवंत दिसे, आजहि दिसते. संस्कृत कविता, भर्तृहरि, जगन्नाथपंडित यांचे ग्रंथ आणि पाश्चात्यांनी संस्कृत विद्येचे व प्राचीन भारताच्या थोरवीविषयी लिहिलेले ग्रंथ, हा त्यांचा दुसरा आवडीचा विषय होता. प्राचीन भारताची संस्कृति, त्या काळच्या विद्या, कला आणि एकंदर कर्तृत्व यांचा अभिमान जागृत करण्यासाठी त्यांनी हा अभ्यास साक्षेपाने केला होता. याशिवाय 'वेदार्थयत्न', 'कौमुदी महोत्सव', 'भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश' अशासारख्या ग्रंथांचें परीक्षण करतांना वेदवाङमय, पाणिनि, पतंजली यांचे व्याकरण-ग्रंथ यांच्याविषयी अवश्य ती सर्व माहिती ते जमा करीत आणि येथील समाजाचें प्रबोधन करण्याच्या दृष्टीने त्या ग्रंथांचें समीक्षण करीत. मूळ ग्रंथाचें साकल्याने परीक्षण करणें असा त्यांचा उद्देशच नसे. महाराष्ट्रभाषेची अभिवृद्धि व्हावी, लोकांची ज्ञानलालसा जागृत व्हावी हा हेतु ठेवून ते हीं समीक्षणे लिहीत. त्या त्या विषयाचें खोल ज्ञान त्यांना नव्हतें. तसें त्यांनी एक-दोन ठिकाणीं सांगूनहि टाकलेलें आहे; पण पुराण-युगांतून लोकांना वास्तव युगांत आणावें या दृष्टीने ग्रंथाचें परीक्षण करण्यास अवश्य तो व्यासंग ते निश्चित करीत.
 'इंग्रेजी भाषा' हा त्यांचा प्रबंध पाहिला म्हणजे विष्णुशास्त्री यांचें अंतिम उद्दिष्ट आणि तें सिद्ध करण्यासाठी त्यांनी केलेला व्यासंग यांचे स्वरूप बरोबर कळून येईल व त्यावरून त्यांच्या व्यक्तित्वाची रूपरेषा मनापुढे स्पष्ट उभी राहील.
गद्य महत्त्व
 या निबंधांत इंग्रेजी वाङ्मयांतील काव्य-नाटकादि साहित्याचा परामर्श ते जवळजवळ करीतच नाहीत. त्यांनी विवेचन केलें आहे तें प्रामुख्याने निबंध व इतिहासग्रंथ यांचें. सत्यदीपिकाकारांनी या प्रबंधावर जे आक्षेप घेतले त्यांना उत्तर देतांना विष्णुशास्त्री यांनी स्वतःच हे स्पष्ट केलें आहे; आणि याचें कारणहि उघड आहे. गद्य-ग्रंथांचा प्रारंभ हे राष्ट्राच्या सज्ञान अवस्थेचें सूचक होय, असा त्यांचा ठाम बुद्धिनिश्चय होता; आणि ती सज्ञान अवस्था या देशाला आणावयाची हें त्यांचें उद्दिष्ट होतें. म्हणूनच इंग्लंड या राष्ट्राला ती दशा ज्या ग्रंथांमुळे आली त्यांचें विवेचन त्यांनी केलें आहे. ते म्हणतात, "मागे स्पेक्टॅटर वगैरे पत्रें सांगितली, त्यांचा लोकांस अतिशय हव्यास लागून, वाचण्याची व ज्ञानसंपादनाची गोडी जशी त्यांस अधिका
 के. त्रि. ८