पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवभारताची निर्मिति । अकरा

असेंच होतें. कलियुगाची कल्पना, नियतिवाद, संसाराची उपेक्षा, तर्काची अवहेलना, जन्मनिष्ठ उच्चनीचता, शब्दप्रामाण्य हीं तत्त्वें व्यक्तीच्या स्वत्वाची पायमल्ली करणारी आहेत; आणि हिंदूंचा आचारधर्म, त्यांचें सर्व कर्मकांड त्यांच्याच आधाराने उभारलेलें आहे. असल्या हीन धर्माचे जे अनुयायी त्यांच्यांत मानवी कर्तृत्वाचा निदर्शक असा कोणताच गुण निर्माण होणें शक्य नव्हतें. पाश्चात्त्य विद्येमुळे ज्यांना नवी दृष्टि प्राप्त झाली त्या सर्व पंडितांना हीच भयावह गोष्ट प्रथम जाणवली; आणि त्यांनी पहिला घण त्या कर्मकांडप्रधान, विवेकहीन, जडधर्मावरच घातला. मानवाला देहप्रधान मानून सांगितलेला हीन व अपवित्र असा आचार-धर्म नष्ट करून, त्याच्या जागीं मनाची, बुद्धीची, आत्म्याची प्रतिष्ठा वाढविणारा तात्त्विक धर्म प्रस्थापित करणें हे त्यांचें उद्दिष्ट होतें. धर्म म्हणजे मनोजय, आत्मसंयमन; धर्म म्हणजे भूतदया, परोपकार, प्रेम, भक्ति होय, हा महनीय विचार त्यांना प्रसृत करावयाचा होता. त्यासाठी त्यांनी वेद, उपनिषदें, गीता ह्या आपल्या धर्म-ग्रंथांचा आधार घेतला. मध्ययुगांत रूढ झालेलें धार्मिक कर्मकांड म्हणजे मूळ धर्म-वृक्षावर माजलेलें बांडगुळ आहे; धर्म ही मुख्यतः मानसिक उन्नति आहे; आणि तिच्यासाठी विवेक, बुद्धि, तर्क, यांचाहि उपयोग श्रद्धा व भक्ति यांच्याबरोबर झाला पाहिजे हा विचार राममोहन, लोकहितवादी, दयानंद इत्यादि धर्मसुधारकांनी लोकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला.
 राजा राममोहन राय यांचा मूर्तिपूजेला विरोध होता; कारण मूर्तिपूजेमुळे समाजाला बौद्धिक दास्य येतें, त्याला परमात्म्याच्या शुद्ध स्वरूपाचा विसर पडतो आणि तो अनेक वेडगळ आचारांना व रूढींनाच धर्म मानूं लागतो असें त्यांचें म्हणणें होतें. म्हणूनच त्यांनी ब्राह्म-समाजाच्या स्थापनेच्या वेळीं मूर्तिपूजेचा त्याग करून निर्गुण परमेश्वराची उपासना करण्याचा उपदेश केला. त्यांना समाजांतील बाह्य विधिविधानांचे मूळच उपटून काढावयाचें होतें, म्हणून त्यांनी मूर्तिपूजेचा निषेध केला. त्याचप्रमाणे त्यांनी वेदान्ताला प्रवृत्तिपर स्वरूप देऊन निवृत्तिपर समाजाला कर्मप्रवण बनविण्याचाहि प्रयत्न केला.
खरा धर्म
 अमूर्त परमात्म्याचें ध्यान व मनन करणें हाच ईश्वरपूजेचा प्रशस्त मार्ग होय, असे मत लोकहितवादी यांनीहि प्रतिपादिले आहे. नीतीवरहि त्यांनी भर दिला आहे. नीति, सदाचार, परोपकार, भूतदया, मनोनिग्रह, क्षमा, शांति, ज्ञानदान याला ते खरा धर्म मानतात. व्रतवैकल्यें, उपासतापास, मंत्रतंत्र हीं निरर्थक कर्मे व दांभिक आचार यांमुळे नीति नष्ट झाली आहे, याचे त्यांना फार दुःख होत असे. त्यांनी आपल्या शतपत्रांत रूढ धार्मिक कर्मकांडावर प्रखर टीका केली असून, खरा धर्म कोणता त्याचें स्पष्ट विवेचन केले आहे.