पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दहा । केसरीची त्रिमूर्ति

तर नव्हतीच, पण ती त्यांना ज्ञातहि नव्हती. त्या काळी भारतीय समाजांतील सर्व जातींमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या सर्व क्षेत्रांतील व्यवहारावर जी अनंत बंधने होतीं, त्यांचा नुसता विचार सुद्धा आज आपल्याला दुःसह वाटतो. स्नानाविषयी नियम, भोजनाविषयी नियम, शौचाविषयी नियम, मुखशुद्धीविषयी नियम, झोपण्यासंबंधी निर्बंध उठण्यासंबंधी निर्बंध, कपड्यांसंबंधी निर्बंध; जन्माच्या आधीची बंधने, मरणानंतरची बंधनें, तिथि, वार, नक्षत्रें, मास यांविषयीची नियंत्रणें, विवाहविषयक आज्ञा, जातिभेदविषयक आज्ञा, परस्परव्यवहाराविषयी आज्ञा; प्रवास, परदेशगमन, भक्ष्याभक्ष्य, पेयापेय, स्पर्श यांचे विधिनिषेध- हे सर्व निर्बंध आणि त्यांचा अल्पसा भंग झाला असतां घ्यावयास सांगितलीं शेकडो प्रायश्चित्तें, हीं मानवी प्रतिष्ठेला उपमर्दकारक आहेत; मानवाच्या व्यक्तित्वाचा त्यामुळे अवमान होतो आणि त्या बंधनांच्या प्रणेत्यांची मानवाबद्दलची तुच्छता-बुद्धि स्पष्ट होते. असल्या समाजांत कोणत्याहि प्रकारचें कर्तुत्व निर्माण होणें कालत्रयी शक्य नाही. समाजाचे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी कांही बंधने आवश्यक आहेत; पण त्या बंधनांना कांही तर्काचा, उपयुक्ततेचा, सद्हेतूचा पाठिंबा असला पाहिजे. तो पाठिंबा जेव्हा नसतो आणि धर्मसिंधु, निर्णयसिंधु ह्या ग्रंथांतल्याप्रमाणे ही बंधनें जेव्हा हेतुशून्य, अर्थशून्य, तर्कशून्य व केवळ धर्माज्ञेवर आधारित अशी असतात, तेव्हा ती मानवी प्रतिष्ठेला अत्यंत घातक ठरतात. या बंधनांनी मानवाचें मानवत्व संपुष्टात येते. एखाद्या सुतावर पाय पडला, एखादा पाण्याचा थेंब अंगावर पडला, कोणाची सावली अंगावर पडली, कसल्या तरी धान्याचा कण पोटांत गेला किंवा नुसता कोणाचा शब्द कानावर आला तरी तेवढ्यामुळे मनुष्य पतित ठरावा, अमंगळ ठरावा आणि त्याबद्दल त्याला प्रायश्चित्त घेणें भाग पडावें, अशा प्रकारच्या धर्माज्ञा प्रचलित करणाऱ्यांच्या मनांत मानवी जीवनाच्या मूलभूत महत्त्वाची किती जाणीव असेल, तें सहज कळून येईल. मानव म्हणचे त्याची बुद्धि, त्याचें मन, त्याचा आत्मा, त्याच्या निष्ठा, त्याची श्रद्धा, त्याची विचारसरणी, त्याच्या आशाआकांक्षा हा सर्व जगांतल्या तत्त्ववेत्त्यांना मान्य असलेला सिद्धान्त भारतांतल्या जुन्या शास्त्री पंडितांनी पायदळी तुडविला होता. त्यांच्या मतें मानव म्हणजे त्याचा देह, त्याचें जड शरीर. "मनुष्य म्हणजे मनुष्याचा आत्मा; देह नव्हे; देह म्हणजे मी, अशी भावना ठेवल्यामुळे मनुष्य मोक्षाला अपात्र ठरतो." अशा प्रकारचें आध्यात्मिक तत्त्वज्ञान एका तोंडाने सांगणाऱ्या धर्मवेत्त्यांनी दुसऱ्या तोंडाने मानवाला जो धर्म सांगितला तो केवळ त्याचा जड देहच विचारांत घेऊन सांगावा, आणि नुसत्या स्पर्शाने किंवा सावलीने त्याला पतित मानण्यास प्रवृत्त व्हावें, यापरता दुसरा अधःपात तो काय !
जुनी घातक तत्त्वें
 ब्रिटिशांच्या पूर्वीच्या हजार वर्षांच्या काळांत येथे समाजरचनेचीं जीं तत्त्वें मान्य व रूढ झाली होतीं त्यांतील जवळ जवळ प्रत्येक तत्त्व मानवी प्रतिष्ठेला घातक