Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्तिमत्व । १११

असत. त्याला "आमचें पुस्तक (निबंधमाला) हेंच या आक्षेपाचे खंडन होय," असें उत्तर या अहंवृत्तीनेच दिलें. शाळाखात्याचे डायरेक्टर चॅटफील्डसाहेब एकदा शाळेत आले होते. अशा वेळीं ते आपल्या अध्यापनाविषयी काय अभिप्राय देतील, या विचाराने शिक्षक सामान्यतः अस्वस्थ असतात; पण असली भीति, शंका, अस्वस्थता शास्त्रीबुवांच्या स्वप्नांतहि कधी आली नसेल. उलट त्यांनीच त्या दिवशीं डायरीमध्ये, "माणूस मोठा भला दिसतो, माझें त्याच्याविषयी अनुकूल मत झालें," असा अभिप्राय लिहून ठेवला. मला दुसऱ्यांचे अभिप्राय नको आहेत, मीच जगावर अभिप्राय देणार, हे त्या अहंवृत्तीचे बोल आहेत.
आत्मप्रत्यय
 ही अहंवृत्ति, हा अहंप्रत्यय विष्णुशास्त्री यांच्या ठायीं नसता तर त्यांच्या हातून जें कार्य झालें तें मुळीच झालें नसतें. मागे अनेक वेळा सांगितलेच आहे की, इंग्रेज राज्यकर्ते, युरोपीय पंडित आणि मिशनरी हे हिंदी जनांचा तेजोवध करण्याचा अहर्निश प्रयत्न करीत होते; आणि हे सर्व लोक मोठे कर्तबगार, विद्वान, अनुभवी असे होते. त्यांना भारताच्या उद्धारार्थ परमेश्वरानेच धाडलें आहे, अशी श्रद्धा मोठ मोठ्या हिंदी विद्वानांच्या मनांत निर्माण व्हावी, इतकें त्यांचें तेज होते, इतकी दीप्ति त्यांच्याभोवती होती. अशा स्थितीत त्यांनी हिंदु धर्म, हिंदु परंपरा, हिंदु इतिहास, यांच्यावर जी निरर्गल टीका चालविली होती तिला उत्तर देणाऱ्या माणसाचा आत्मप्रत्यय अगदी असामान्य असणें अवश्य होते. अत्यंत उग्रदर्प असलेला अहंकारच तेथे टिकणें शक्य होतें. अतिशय दुर्दम्य अशा अहंमतीने संपन्न असलेला पुरुषच त्यांचे आघात लीलया झेलून त्यांच्यावर तितक्याच जोराने प्रत्याघात करण्यास समर्थ झाला असता. विष्णुशास्त्री हा तसा पुरुष होता. विष्णुशास्त्री म्हणजे मूर्तरूपाला आलेला अहंकारच होता. त्यामुळेच इंग्रेज म्हणजे देवमाणसें, सर्व गुणांचें आगर म्हणजे इंग्लंड, खरा धर्म म्हणजे सिनिया पर्वतावरचा, विद्वत्त्व, सुशीलत्व, शूरत्व हे सर्व गोऱ्या कातड्याकडे, आणि हिंदु म्हणजे अगदी कृमि-कीटक, असल्या घातक, भ्रांत तत्त्वज्ञानाच्या मगरमिठींतून ते स्वजनांना मुक्त करूं शकले. त्यांच्या ठायीच्या या अहंकारालाच, त्यांनी गर्व असें म्हटलें आहे. आणि या विपत्काळी आपल्या सर्व समाजानेच अशा गर्वाची स्वतःच्या मनांत जोपासना केली पाहिजे, त्यावांचून आपली धडगत नाही, असें निःशंकपणे सांगितलें आहे.
राष्ट्रीय अहंकार
 विष्णुशास्त्री यांच्या या वैयक्तिक अहंकाराला सामाजिक व राष्ट्रीय अहंकाराची बैठक होती, हें आपण ध्यानांत ठेविले पाहिजे. "आज हिंदी जनांचें कर्तृत्व अगदी हीन पातळीला गेलें असलें तरी त्यांच्या अंगचे गुण आज सुप्त आहेत." असे ते म्हणत. निबंधमालेचा उद्देश काय तें सांगताना ते म्हणतात, आमच्या लोकांत कितीहि दोष असले तरी बुद्धीचा मंदपणा हा, आमचा अत्यंत तिरस्कार