Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-१५-

व्यक्तिमत्त्व


 विष्णुशास्त्री यांचे कार्य आणि त्यांचें साहित्य यांचा येथवर सर्वांगीण विचार केला. त्यांचे ध्येय काय होतें, दर वेळी डोळ्यांपुढे त्यांनी कोणतें उद्दिष्ट ठेवलें होतें, त्याच्या सिद्धीसाठी कोणते प्रयत्न केले आणि त्यांना यश काय आलें याचाहि विचार केला. आता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करून हें सर्वं विवेचन पुरें करावयाचें आहे.
 मनुष्याचें व्यक्तिमत्त्व हें त्याचे विचार, त्याच्या भावना, त्याची प्रज्ञा, त्याने केलेले बहुविध उद्योग, त्याचा मित्रपरिवार, आणि त्याच्या काळची परिस्थिति यांतून साकार होत असते; आणि त्या व्यक्तिमत्त्वांतून वरील घटकांवरहि परिणाम होत असतो. एका दृष्टीने आधी झाड की आधी बी अशासारखाच हा प्रश्न आहे. दोन्ही आधी आणि दोन्ही मागून असेंच नेहमी वाटत असतें. व्यक्तिमत्त्व आणि परिस्थिति यांचा विचार करतां या दोहींचा एकमेकांवर परिणाम होत असतो; आघात- प्रत्याघात होत असतात एवढेच निश्चयाने म्हणतां येईल. येथे आपणांस या तपशिलांत शिरावयाचे नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रधान गुण तेवढे पाहवयाचे आहेत. कारण हा प्रबंध म्हणजे त्यांचें चरित्र नसून त्यांच्या कार्याचें विवेचन व मूल्यमापन आहे.
अहंवृत्ति
 विष्णुशास्त्री यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रधान गुण म्हणजे त्यांची अहंवृत्ति हा होय. "मी मराठी भाषेचा शिवाजी आहे" हे त्यांचे उद्गार या अहंवृत्तींतूनच निघालेले आहेत. मराठी भाषा ही पुरेशी अर्थव्यंजक नाही. मनांतले सर्व विचार, सर्व भाव व्यक्त करण्याचें सामर्थ्य तिला नाही, असा आक्षेप त्या वेळीं कोणी घेत