११२ । केसरीची त्रिमूर्ति
करणाराच्यानेहि आमच्या माथी मारवणार नाही! चलाखपणांत आम्ही कोणत्या लोकांस हार जाणार नाही, अशी आमची खात्री आहे. आमच्या बुद्धीचे प्रभाव जगाच्या इतिहासावर अक्षय खोदलेले आहेत व चंद्र-सूर्य आहेत तोंवर त्यांचा झेंडा मिरवत राहील!" स्वभाषा, स्वधर्म, स्वदेश, यांचा अभिमान तर त्यांना होताच; पण दैन्यावस्थेला गेलेल्या स्वजनांचाहि अभिमान ते तितक्याच तीव्रपणें प्रगट करीत. त्या स्वजनांच्या अभिमानाची, अहंवृत्तीची जपणूक करणें हेंच त्यांच्या वैयक्तिक अहंवृत्तीचें प्रमुख कार्य होतें.
व्यासंग
विद्वत्ता, पांडित्य, अखंड व्यासंग हा विष्णुशास्त्री यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा घटक होय. स्वभाषा, स्वधर्म, स्वदेश यांवर होणाऱ्या आघातांचें निवारण करून ते आघात करणाऱ्या शत्रूंवर त्यांना प्रत्याघात करावयाचे होते. हें सर्व युद्ध बौद्धिक पातळीवरून व्हावयाचें होतें. इंग्रज पंडित व मिशनरी यांचीं सर्व शस्त्रास्त्रे बौद्धिक होतों. इतिहास, भाषाशास्त्र, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान यांच्या आधाराने ते बोलत व लिहीत. त्यांतून आधार काढून, प्रमाणें देऊन, हिंदु धर्म, हिंदु तत्त्वज्ञान यांतील सिद्धांतांचे खंडन करीत व स्वधर्माचें मंडन करीत. भारताच्या प्राचीन परंपरेला दूषण देतांना इतिहासाचें बळ मागे उभे करीत. विष्णुशास्त्री यांनी तींच शास्त्रास्त्रे वापरलीं नसती तर, हिंदी राजे इंग्रजांच्या भारी शस्त्रबळामुळे जसे रणांत पराभूत झाले तसेच, विष्णुशास्त्री इंग्रज पंडितांपुढे पराभूत झाले असते. पण शास्त्रीबुवांनी हें चांगलें जाणलें होतें, आणि डेक्कन कॉलेजांत असल्यापासूनच त्यांनी या युद्धाला लागणारी शस्त्रास्त्रे व दारुगोळा आपल्या कोठारांत भरण्यास सुरुवात केली होती. ग्रंथकार होण्याचें त्यांचे ध्येय तेव्हापासूनच निश्चित झालें होतें. बी. ए. झाल्यावर त्यांनी कायद्याचा अभ्यास करावा, असें कृष्णशास्त्री यांनी त्यांना सुचविलें होते; पण त्यांनी तें मुळीच मनावर घेतलें नाही. त्यांना बौद्धिक कुरुक्षेत्रावर जावयाचें होतें, म्हणून त्या बाणभात्यांचा साठा ते करीत होते.
बहुश्रुतता
पण विष्णुशास्त्री यांची विद्वत्ता ही बहुश्रुततेच्या स्वरूपाची होती. एखादा विशिष्ट विषय घेऊन त्याचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला नव्हता. डॉ. भांडारकर, न्या. मू. रानडे यांच्यासारखें त्यांचें पांडित्य नव्हतें. डॉ. भांडारकर हे संस्कृत विद्येचे, प्राचीन इतिहासाचे पंडित होते. न्या. मू. रानडे अर्थशास्त्राचे पंडित होते. विष्णुशास्त्री त्या अर्थाने कोठल्याच विषयाचे पंडित नव्हते. हिंदी जनांची स्वत्वजागृति करणें, आणि इंग्रज राज्यकर्त्यांचें खरें स्वरूप त्यांना दाखविणें हें त्याचें उद्दिष्ट होतें. ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनामुळे युरोपांत जसें प्रबोधन झाले, तसें प्रबोधन त्यांना येथे घडवावयाचें होतें. मागे एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रांत मानसिक क्रांति घडविणें हें त्यांचें उद्दिष्ट होतें. आणि या उद्दिष्टांसाठी अवश्य