Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाग्वैभव । १०९

जगविख्यात ग्रंथकारांवरहि जो 'आपली क्षुद्ध लेखणी' उचलतो तो महामूर्ख कसा नव्हे? इंग्रेज लोकांनी त्यांच्या देशावर जन्मोजन्मीहि न फिटणारे जे असंख्य उपकार करून ठेवले आहेत ते न जाणता जो प्रत्येक इंग्रजास प्रतिख्रिस्त मानीत नाही, खिस्ती धर्म खरा, हिंदु धर्म खोटा अशी ज्याची अजून खात्री झाली नाही; पाठीवर घाव घेऊन तडक पळणारा इंग्रजी सोजीरहि आमच्या बाजीरावापेक्षा, रणजितसिंगापेक्षा शतपट अधिक शूर असें ज्यास भासत नाही, ज्याची पूर्वजप्रीति इंग्रेजी ज्ञानाने नष्ट होत नाही, महाराणीचे ठायीच्या राजनिष्ठेचा व आपल्या देशाच्या शूरांच्या वर्णनांत केवढा जबरदस्त विरोध आहे तो ज्यास दिसत नाही, तो केवढा नष्ट, केवढा कृतघ्न!"
 इंग्रज भारताचें कल्याण करणार, त्यांचें राज्य दैवी कृपेने येथे झाले, या उद्गारांची विष्णुशास्त्री यांना भयंकर चीड असे. अशा प्रलापांचा समाचार घेतांना, 'आमच्या देशाची स्थिति' या निबंधांत ते म्हणतात, "मराठीशाहीची टोलेजंग इमारत उभारून दिली तेव्हा शिवाजीमहाराजांनी इंग्रेजी शिपाईगिरी किंवा मुत्सद्देगिरी चार हजार कोसांवरून उसनी मागून आणली होती काय? बाळाजीपंत पेशव्याने दिल्ली- अटकेपर्यंत नजर पोचवून अवघ्या बादशाहीस आपल्या जाळ्यांत गुदरविले तेव्हा आपली बुद्धि एखाद्या आंग्लभौम विद्यालयांत पाजळून घेतली होती काय?"
 इंग्रज राज्यकर्ते, पंडित व मिशनरी यांच्याप्रमाणेच स्वकीयांवरहि त्यांच्या नाकर्तेपणाबद्दल विष्णुशास्त्री उपरोधिक टीका करीत. त्या वेळच्या राजे-रजवाड्यांवर टीका करतांना विष्णुशास्त्री म्हणतात, पाटीलबोवांचा तर खुद्द लंडनवर भगवा झेंडा रोवण्याचा इरादा होता; आणि आता? आता शिंदे यांनी मोठें शतकृत्य केलें म्हणजे काय, तर कलकत्त्यास एखाद्या 'बॉलांत' कमांडर इन् चीफच्या बायकोबरोबर नाचले! आणि महाराज होळकर यांनी मोठी तरवार गाजविली म्हणजे काय, तर एखादी गिरणी काढली!" पुणे-वर्णन लिहून स्वकीयांची निरर्गल निंदा करणाऱ्या लेखकाविषयी लिहितांना ते म्हणतात, "एकंदरीत हा ग्रंथ वाचला असतां मिशनरी लोकांच्या शिक्षणाने बुद्धि केवढी फाकते, सत्यनिष्ठा केवढी वाढते वगैरे गोष्टी स्पष्ट दिसून येतात!"
 विष्णुशास्त्री यांच्या शैलीच्या या अभ्यासावरून, त्यांच्या यशाचें श्रेय त्यांचें स्वत्व, स्वाभिमान याविषयीचे जे विचार त्यांना जसें आहे तसेंच त्यांच्या अद्वितीय भाषाशैलीलाहि आहे हे सर्वांना मान्य होईल असें वाटतें. ते खरोखरीच मराठी गद्याचे जनक होते यांत शंका नाही.