१०८ । केसरीची त्रिमूर्ति
खवा स्वतःच लाटीत आहे. "आम्ही हिंदुस्थानच्या कल्याणाकरिता येथे आलों" असें म्हणत इंग्रज सत्तारूढ झाले; आणि इसापनीतींतील घोड्यासारखी आमची स्थिति झाली. वरील स्वाराने त्यास सांगितलें, "बारें, तूं म्हणतोस तें खरें पण आता नाही माझ्याने तुला सोडवत. तूं इतका उपयोगी आहेस हें मला पूर्वी माहीत नव्हते. आता तुझ्या पाठीवरचें खोगीर कधी निघेल ही आशा सोडून दे." वानर आणि घोडा यांच्या वरील गोष्टीमुळे इंग्रज राज्यकर्त्यांचे स्वरूप चित्र काढल्याप्रमाणे डोळ्यापुढे उभे राहतें. पंचतंत्रांतील गोष्टीने हेंच उद्दिष्ट साधलें आहे. पंचतंत्रांतील तीन धूर्तांनी त्या भोळ्या ब्राह्मणास फसवून प्रत्यक्ष पशूवर जशी कुत्र्याची भ्रांति करविली, त्याप्रमाणे आमचे पूर्वज सर्व राष्ट्रांत अग्रगण्य असतां व साऱ्या जगाचे गुरु असतां त्यांच्या पदरीं या लबाड, कुत्सित लोकांनी वेडगळपणा बांधला आहे. मिशनरी, राज्यकर्ते व मेकॉलेसारखे पंडित हेच ते तीन धूर्त होत हें उघड आहे.
पण संस्कृत-मराठी कवींचीं वचनें, नानाविध न्याय, म्हणी, उपमा-दष्टान्त; पंचतंत्र, इसापनीतीतील पशुपक्ष्यांच्या कथा यांपेक्षाहि विष्णुशास्त्री यांच्या शैलीचा जास्त तेजस्वी अलंकार म्हणजे उपहास-उपरोध हा होय. त्यांच्या शैलीची शोभा या एकाच अलंकाराने द्विगुणित नव्हे दशगुणित झाली आहे. व्हाल्टेअर, ज्यूनियस यांचा त्यांनी अभ्यास केला होता; आणि तसाच विखार आपल्या लेखणींत त्यांनी उतरविला होता. त्यामुळे तिचा डंख ज्यांना होई त्यांना असह्य वेदना होत. एलिफास, ज्ञानोदय यांचा जो जळफळाट त्या वेळीं त्यांच्या पत्रांवरून दिसून येई त्यावरून हा डंख किती विषारी असे, तें चांगलें कळून येतें. मेकॉले, मॉरिस यांसारखे इंग्रज विद्वान, विलसनसारखे पाद्री आणि लिटन, टेंपल, स्ट्रॅची यांसारखे राज्यकर्त यांच्यावर विष्णुशास्त्री टीका करूं लागले म्हणजे त्यांच्या या उपरोधिक लेखनाला विलक्षण धार चढे; आणि ते विषदिग्ध खड्गाचे प्रहार भारताच्या शत्रूंवर होत असल्यामुळे वाचकांना विलक्षण आनंद होई. मेकॉलेसाहेब म्हणाले की, हिंदुस्थान-देश पोर्तुगाल, आयर्लंड यांहून भिकारी आहे. त्यावर विष्णुशास्त्री म्हणतात, "हिंदु- स्थान भिकारी! वाः! दिवसाढवळ्या साऱ्या जगाच्या डोळ्यांत माती टाकण्याचें साहेबांचें धाडस त्यांचें त्यांसच शोभो! हिंदुस्थान जर दरिद्री झाला तर साहेबांचा देश कशाने श्रीमंत झाला कोण जाणे! शिशाच्या व कोळशाच्या खाणींनी तर नाही ना? कोणी नाही म्हणावें? उद्या मेकॉलेसाहेबांचे एखादे बंधु जाहीर करतील की "अहो! हिमालयाविषयी भूगोलवेत्त्यांना भ्रांति आहे. आमच्या इंग्लंडांतील एखादें लहानसें टेकाडहि त्यास उंचीत हटवून टाकील! तसेंच गंगा, ब्रह्मपुत्रा यांना लंडनांतील एखादें गटारहि मागे सारून देईल!" 'ज्ञानोदय' हें जें ख्रिस्ती मिशनऱ्यांचें मासिक त्याने विष्णुशास्त्री यांशीं उभा दावा धरला होता. वेळोवेळी त्यांच्यावर कडाका उडवून मिशनरी शास्त्रीबुवांना राजद्रोही ठरविण्याचा प्रयत्न करीत. त्याच्या टीकेला उत्तर देतांना विष्णुशास्त्री म्हणतात, "बरोबरच आहे. मेकॉले, मिल्ल अशा