वाग्वैभव । १०७
व घाण दोन नद्या धरून त्यांत सोडून जशी पार धुवून टाकली, तसेच एखाद्या अचाट महावीराने उठून येथे केल्याखेरीज दुसरा मार्ग नाही!" "आमच्या देशाची स्थिति' या निबंधांत आपले प्रतिपादन नित्य एका पक्षाचें नसतें, कधी या पक्षाचें असतें तर कधी त्या पक्षाचें- याचें स्पष्टीकरण करतांना चिपळूणकर म्हणतात, "सत्य हें एकाच राष्ट्राला, एकाच धर्माला किंवा एकाच पक्षाला अनुसरून असतें असें नाही; तर अशोधित धातूंत जसे सुवर्णरज यदृच्छेने मिसळलेले असतात, व रसायन-व्यापारांनी त्यांचें पृथक्करण करून ते वेगळे काढावे लागतात त्याचप्रमाणे सत्याची गोष्ट आहे. त्याचे अंश ज्यांत मिश्रित झाले नाहीत असा प्रायः कोणताहि पक्ष नाही. यास्तव एकाच पक्षाचा दृढ अभिमान हा दुरभिमान होय." 'लोकभ्रम' या निबंधांत शास्त्रीय सत्यापुढे बहुमताला कांही किंमत नाही हा विचार सांगतांना ते म्हणतात, "ज्याच्यापाशी शास्त्रीय सत्याचें मजबूत प्रमाण आहे तो मनुष्य उलट पक्षाच्या कोट्यानुकोटि मनुष्यास भारीच होतो. ठीकच आहे. पाहा की, ज्यापाशी दिवा आहे तो त्या दिव्यावर अंधाराचे डोंगरचे डोंगर आणून लोटले तरी डगमगेल काय? असो; पण अशा सत्यस्वरूप ज्योतीचे किरण एकंदर जगाच्या ज्ञाननेत्रांत सुखेकरून कधीहि प्रवेश करीत नाहीत." संपत्तीला विष्णुशास्त्री यांनी शस्त्र म्हटलें आहे. शस्त्र हितकारक किंवा घातक, असें कांहीच नसतें. त्याचा उपयोग करणाऱ्या मालकावर सर्व अवलंबून असतें. याचसाठी दुसरें उदाहरण त्यांनी अग्नीचें दिलें आहे. तेंहि असेच समर्पक आहे. षड्रिपूंचा विचार करतांना त्यांनी त्यांना घोड्याची उपमा दिली आहे. स्वार जर कुशल असेल तर घोडा हा कल्याणच करील; पण तो ताब्यांतून गेला तर मात्र कठीण प्रसंग. तसेच षड्रिपूंचे आहे. "वाऱ्यावांचून अग्नि जसा निर्बल त्याचप्रमाणे मोठी जाज्वल्य बुद्धीहि दृढ निश्चयावांचून पंगु होय;" "सूर्यबिंबावरून ढग जसे जातात-येतात व अखेरीस आपोआप वितळून जातात, त्याप्रमाणेच जॉनसनच्या ग्रंथांवर दूषकांचे आक्षेप शतशः आले व कालगत्या लीपूनहि गेले." "मोठ्यांच्या अंगीं दोष असले तरी ते लहानांनी काढू नयेत हें म्हणणें म्हणजे चंद्रास कलंकी म्हणूं नये किंवा सूर्याच्या बिंबावरचे काळे डाग पाहूं नयेत, असें म्हणण्यासारखेंच असमंजस झालें." असे उपमा-दृष्टान्त निबंधमालेंत जागोजाग दृष्टीस पडतात. त्यामुळे भावार्थ विशद तर होतोच; आणि शिवाय भाषेला मनोहारित्वहि येतें.
उपमा- दृष्टान्ताप्रमाणेच 'इसापनीति' व 'पंचतंत्र' यांतील मजेदार प्रसंग व चुटके यांनी भावार्थं खुलविणें हाहि विष्णुशास्त्री यांच्या शैलीचा एक विशेष आहे. "आकाशांतील प्रभूने आमचा कारभार करण्यासाठी इंग्रजांना मुनीम नेमलें आहे; पण हा मुनीम इसापनीतील खवाखाऊ माकडाप्रमाणे कृति करीत आहे!" भावार्थ असा की, दोन मांजरांच्या भांडणांत त्याने सर्व खवा स्वतःच लाटला त्याप्रमाणे येथील निरनिराळया जमातींच्या भांडणांत हा मुनीम न्याय देण्याचें मिष करून सर्व