Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०६ । केसरीची त्रिमूर्ति

संभाळावें तें विष्णुशास्त्री यांनी "नीरक्षीर विवेके हंसालस्यं त्वमेव तनुषे चेत् । विश्वस्मिन्नधुनाऽन्यः कुलव्रतं पालयिष्यति कः ॥" या जगन्नाथपंडिताच्या वाणींतून वदविले आहे.
 निबंधाच्या शिरोभागीं जशी, तशीच त्याच्या अभ्यंतरांतहि शेकडो वचनें विष्णुशास्त्री गुंफून देतात. त्यांमुळे निबंध सारखे चमचमत राहतात व मनाला आल्हाद वाटतो. विद्वत्त्व आणि कवित्व एका ठिकाणीं नांदत नाहीत, कारण "प्रायेण सामग्ऱ्याविधौ गुणानां पराङमुखी विश्वसृजः प्रवृत्तिः ।" संपत्तीच्या अंगीं मूलतः हानिकारक कांही नाही, तिचा त्याग करणारा मनुष्य अधोगतीला जाणार नाहीच, असें नाही, तें सर्व मनुष्याच्या मनोनिग्रहावर अवलंबून आहे- हा भावार्थ "वनेषु दोषाः प्रभवंति रागिणां । निवृत्तरागस्य गृहं तपोवनम् ॥" या वचनानाने उत्तम व्यक्त होतो.
 संपूर्ण इतिहास मनुष्याला कधी उपलब्ध होणार नाही हें खरें, पण म्हणून इतिहासाचा अभ्यासच करूं नये हें म्हणणें युक्त नाही. कारण- "आकाश अंत, न कळोनिहि अंतरिक्षीं । आकाश आक्रमति शक्त्यनुसार पक्षी ।"- वामनपंडित.
  नाना प्रकारचे न्याय आणि म्हणी हेहिं भाषाशैलीचे शोभाकरधर्मच आहेत. कविवचनांप्रमाणेच त्यांनीहि सौंदर्यात भर पडते. कांही पंडितांना काव्य आवडत नाही. त्यांच्याविषयी विष्णुशास्त्री म्हणतात की, "यामुळे काव्याचें मनोहर सौंदर्य केशमान कमी होत नाही. उलट ते पंडितच वृद्धप्रमदान्यायाने उपहास्य होतात!" येथे आलेले अनेक इंग्लिश अधिकारी अगदी सामान्य असतात; पण ते परत इंग्लंडला गेले की 'एरंडोऽपि द्रुमायते' या न्यायाने मोठी प्रतिष्ठा पावतात. मारिस साहेबाने हिंदुस्थानचा इतिहास लिहिला. त्यांत भारतीय वीरांना उगीच एखादें पान देऊन, विस्तृत वर्णन केलें आहे तें मेजर लॉरेन्स, कर्नल मॉनसन यांचें. म्हटलेच आहे- "स्वजातिः दुरतिक्रमा!" रानावनांत, उन्हातान्हांत वाटेल तसे दौडणारे मराठे वीर संताजी, धनाजी, त्यांच्यापुढे औरंगजेबाच्या लष्करांतले तिस्मारखान अगदी निस्तेज झाले. मराठी भाषेत म्हणच आहे "रानचा वारा आणि घरचा चारा! यांची बरोबरी कशाने होणार नाही."
 न्याय आणि म्हणी हीं एक प्रकारचीं सुभाषितेंच असतात, पण ती कवींचीं नसून समाजाची असतात; पण त्यामुळे तीं अगदी सुबोध असतात.
 अत्यंत समर्पक व उद्बोधक उपमा-दृष्टान्त देऊन अर्थ फुलविण्याची हातोटी विष्णुशास्त्री यांच्या ठायीं विशेषत्वाने दिसते. 'इतिहास' या निबंधांत ते म्हणतात, 'इंग्रेज लोकांच्या अज्ञानाने व दुराग्रहाने, आणि ख्रिस्ती भटांच्या मतलबी व हेकटपणाच्या उपदेशाने या देशांत स्वतःविषयीच्या दुर्मतांचें जें महाजाल चोहोकडे पसरलें आहे तें पार नाहीसें करून लोकांचीं मनें साफ दुरुस्त करणें तर ग्रीक लोकांच्या हर्क्युलीसने आजियस राजाच्या तबेल्यांत फार दिवस बिऱ्हाड करून राहिलेली लीद