वाग्वैभव । १०५
जशी काव्याला शोभा येते तशी विचारसाम्यदर्शक वचनांनी गद्याला येते. तशी वचनें येथे अभिप्रेत आहेत. मराठी अवतरणेंहि त्यांनी दिली आहेत; पण भर आहे तो संस्कृत वचनांवर. त्यांतहि शिरोभागी दिलेली अवतरणें पाहून मन हरखून जातें.
'प्रस्तुत मालेचा उद्देश' या निबंधांत बहुश्रुतता हें मासिक-पुस्तकांचें उद्दिष्ट असावें, असें त्यांना सांगावयाचें आहे. तो सर्व भाव व्यक्त व्हावा म्हणून "पिबामः शास्त्रौघान् ! उत विविधकाव्यामृतरसान् ।" हें भर्तृहरीचें वचन त्यांनी शिरोभागी दिले आहे. नानाविध शास्त्रे व काव्य-नाटकें आम्ही अभ्यासूं- असा त्याचा भावार्थ आहे. सर्व निबंधाचा सारार्थ यांत आला आहे; आणि श्लोकाच्या एका लहान चरणांत तो सामावल्यामुळे त्याला चित्तवेधक रूप आले आहे. शिरोभागी देण्यासाठी विष्णुशास्त्री यांनी सर्वत्र अशींच वचनें निवडलीं आहेत. सर्व प्रतिपादनाचें रूप एका दृष्टिक्षेपांत त्यामुळे येतें.
इतिहास या विषयावरील तिसरा निबंध पाहा. प्राचीन काळीं भारत हा अत्यंत वैभवशाली देश असूनहि आज इंग्लिश पंडित, इंग्लिश मिशनरी इत्यादिकांनी त्याची विटंबना मांडली आहे, हा या निबंधाचा विषय आहे. तो नेमका व्यक्त व्हावा म्हणून "न यत्न स्थेमानं...हरेरद्य द्वारे शिव शिव शिवानां कलकलः ।" हें जगन्नाथपंडिताचें भामिनी विलासांतील वचन त्यांनी दिले आहे. "ज्या गुहेपुढे उभे राहण्यास मदमत्त हत्तीहि धजत नसत त्याच सिंहाच्या गुहेपुढे आज भालू भुंकत आहेत" यांतील रूपक किती समर्पक आहे; आणि मेकॉले मिल प्रभूति पंडितांविषयीचा विष्णुशास्त्री यांच्या मनांतला तिरस्कार त्यांतून कसा टचून व्यक्त होतो, हें सहज ध्यानांत येईल; आणि निबंधांच्या प्रारंभी दिलेलीं हीं वचनें म्हणजे निबंधमालेचें एक आगळें सौंदर्य आहे हें कोणालाहि मान्य होईल.
इंग्लिश राज्यकर्ते या देशांत केवळ लूटमार करीत आहेत, या भूमीचा रक्तशोष करीत आहेत; अशाने हा देश भुकेकंगाल होऊन उद्या त्यांना लुटावयालाच कांही राहणार नाही, एवढा तरी विवेक त्यांनी ठेवावा- हें 'आमच्या देशाची स्थिति' यांतील तिसऱ्या निबंधाचे प्रतिपाद्य आहे. अशा या निबंधाच्या आरंभी कविवचन कोणते आहे? "राजन् दुधुक्षसि यदि क्षितिधेनुमेनां... नाना फलैः फलति कल्पलतेव भूमिः ।" हे राजा या भूमिरूप गाईचें तुला दोहन करावयाचें असेल तर लोक हा जो तिचा वत्स त्याचा उत्तम सांभाळ कर! तसें केलेंस तरच ही भूमि नानाफलांनी समृद्ध होईल!" पारतंत्र्यामुळे आमची अतिशय हानि झाली आहे हा भावार्थ- "फारचि बरी निरयगति, परवशता शतगुणे करी जाच" या मोरोपंतांच्या वचनांतून उत्तम व्यक्त होतो. शकुन-अपशकुन फलज्योतिष हे सर्व लोकभ्रम आहेत, त्यांत तथ्य कांही नाही हें तुकोबांच्या- "सांगो जाणती शकुन, भूत भविष्य वर्तमान । त्यांचा आम्हांसि कंटाळा, पाहो नावडति डोळा ॥" या अभंगवाणीपेक्षा जास्त निश्चयात्मक रीतीने कोण सांगणार? ग्रंथावर टीका करतांना कोणतें धोरण