१०४ । केसरीची त्रिमूर्ति
येणार, याची ऐकणाराला चिंता वाटते. विष्णुशास्त्री यांच्या आधीच्या लेखकांचे निबंध वाचतांना वाक्याचा तोल साधून ते शेवटपर्यंत कसे पोचणार, अशी शंका वाटू लागते; पण शास्त्रीबुवांचे निबंध वाचतांना अशी शंका मनाला शिवतहि नाही. "जी भाषा बोलणारांनी दिल्ली-अटकेपर्यंत आपले झेंडे नेऊन लावले, जींत तुकाराम-रामदासांसारख्या भगवत्परायण साधूंनी आपले श्रुतिवंद्य अर्थ ग्रथित केले, जीस मुक्तेश्वर, वामनपंडित, मोरोपंत इत्यादि कवींनी आपल्या रसाळ व प्रासादिक वाणीने संस्कृत भाषेची प्रौढी आणली, त्या भाषेस आवेश, गांभीर्य व सरसता या गुणांकरिता कोणत्याहि अन्य भाषेच्या तोंडाकडे बघण्याची खास गरज नाही, अशी आमची खात्री आहे" अशी दीर्घ वाक्यें ते सहज पेलूं शकतात हें लोकांना पहिल्या अंकापासूनच दिसूं लागलें; आणि भाषाप्रभुत्वाचा हा नवाच खेळ आपण पाहत आहों हें त्यांच्या ध्यानांत आलें. 'आमच्या देशाची स्थिति' या शेवटच्या निबंधांतलें हें वाक्य पाहा. "पण हल्ली चालू असणारे एकोणिसावें शतक हें तर सुधारणेच्या संबंधाने पहिल्या प्रतीचा बाणा मिरविणारें असतां व या शतकांत सद्धर्माचे पवित्र प्रेषित आकाशांतली दिवटी घेऊन सारें भूमंडळ आक्रमीत असतां व येशूच्या दयामय धर्माचा जिकडे तिकडे गजर करीत असतां, कंठस्नानाचा व झोटिंगपाच्छाईचा प्रचार पहिल्यापेक्षा आता काडीभरहि कमी आहे असें नाही." वाक्य लांब असूनहि अर्थाचा ओघ कोठे अडखळत नाही, प्रसन्नता कमी होत नाही. भाषाप्रभुत्वाचें हेंच लक्षण होय.
अशा या मोत्यांच्या सरांतून मधून मधून संस्कृतवरून मराठींत अन्वर्थक अशीं तयार केलेली वा घेतलेलीं शब्दांचीं रत्नें गुंफल्यामुळे भाषेची शोभा द्विगुणित झाली आहे. अभिवृध्यर्थ, कृतकृत्यता, पंडितमान्यता, उपपादन, पुनरुज्जीवन, विगतार्थं, भाषेचें वर्णसौंदर्य, बुद्धीची प्रगल्भता, उद्दाम कल्पनाशक्ति, मनोवृत्तीचे व्यापार, अनिष्टांचें मूळ, लेशमात्र शुभवर्तमान, भूमंडळ, श्वेतदीप, शार्मण्य देश, शब्दपांडित्य; दुर्मतांचें महाजाल, स्वार्थसाधु मिशनरी, अप्रयोजकपणा, तिरस्कारास्पद, जन्मसिद्ध निष्प्रतिबंध, मुद्रणस्वातंत्र्य, वर्तमानपत्र, स्थित्यंतर, जनसमूह, भरतखंड, देशबंधुत्वाचें थोरलें नातें.– यांसारखे शब्द शास्त्रीबुवांच्या निबंधांत मधून मधून चमकत असतात. मराठी भाषेच्या अंगीं अर्थव्यंजकता, वर्णसौंदर्य फार कमी आहे, हा अलीकडील विद्वानांचा ग्रह मोडून टाकण्यास आपले निबंध कारण व्हावे अशी त्यांची इच्छा होती. निबंधमाला वाचून खाली ठेवल्यावर ती इच्छा पूर्ण झाली आहे, असाच निर्वाळा वाचक देतील.
लांब, पल्लेदार, भरघोस वाक्यें आणि समर्पक, समुचित शब्दयोजना यांखेरीज इतरहि अनेक प्रकारचा शृंगार विष्णुशास्त्री यांनी आपल्या भाषेला चढविला आहे. त्यांतील एक विशेष शोभादायक अलंकार म्हणजे संस्कृत वचनें. आधार-प्रमाण म्हणून दिलेलीं अवतरणें, तीं ही नव्हेत. त्यांचा परामर्श वर केला आहे. कल्पनासादृश्यामुळे