Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-१४-

वाग्वैभव


 कोणत्याहि वास्तूचें निरीक्षण करतांना प्रथम तिचा भक्कमपणा तपासून पाहवा लागतो. कारण त्यावरच तिची सर्व उपयुक्तता अवलंबून असते. तिचा पाया, तिचे खांब, तिच्या भिंती या, वरील मजले पेलून धरण्याइतक्या भक्कम आहेत की नाहीत, हें आधी पाहवें लागतें. नंतर तिचीं दालनें, तिच्या खोल्या, देवघर, माजघर, सैपाकघर, ओटी, पडवी हें सर्व सांसारिक व्यवहाराच्या दृष्टीने बांधलें गेलें आहे की नाही, हें पाहवें लागतें. ही पहिली तपासणी झाली म्हणजे मग तिचें सौंदर्य पाहवयाचें. तिच्यांतील प्रमाणबद्धता, समता, वक्रता, तिचा रंग, तिच्या भिंतीवरील चित्रे, हे सौंदर्याचे घटक होत. मंदिराची सर्व शोभा त्यावरून ठरते; आणि प्रथम ती शोभाच नजरेत भरते. तरीहि खरा शिल्पज्ञ आधी तपासणी त्या मंदिराच्या टिकाऊपणाची व उपयुक्ततेचीच करील. निबंधमालेची समीक्षा करतांना हाच क्रम ठेवणें उचित होय. त्याअन्वये प्रथम विष्णुशास्त्री यांच्या निबंधांतील उपक्रमोपसंहार, विषयनिरूपणाची व्यवस्था, प्रतिपादनांतील आधारप्रमाणें, लेखकाची बहुश्रुतता, त्याची युक्तिवादपद्धति यांची समीक्षा आपण केली. आता त्या निबंधाच्या सौंदर्याची समीक्षा करावयाची आहे. हें सौंदर्य म्हणजेच लेखनशैली किंवा लेखकाचें वाग्वैभव होय.
 हें सौंदर्य पाहूं लागतांच, प्रथम नजरेत भरतें तें त्यांचें भाषाप्रभुत्व. लांब, प्रदीर्घ, पल्लेदार वाक्यांची त्यांनी फेक सुरू केली की वाचक स्तिमित होऊन जातो. भाषेला वाटेल तशी वांकविण्याचें सामर्थ्य लेखकाच्या ठायीं आहे, याची प्रचीति येते; आणि मनाला प्रफुल्लता येते. नवा गवई गावयास बसला व तो एखादा राग आळवूं लागला म्हणजे त्याच्या ताना, आलाप, व्यवस्थित संभाळून हा समेवर कसा