Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०२ । केसरीची त्रिमूर्ति

उलट आफ्रिकेंतील अनेक देश पूर्ण दारिद्र्यांत दीर्घकाळ आहेत; पण त्यांनी मोठमोठी राज्य किंवा साम्राज्यें स्थापिल्याची उदाहरणें नाहीत. अन्य क्षेत्रांत उत्कर्ष साधला असेंहि नाही. 'भावे भावः अभावे अभावः' याचें अस्तित्व तेथे त्याचें अस्तित्व, याचा अभाव तेथे त्याचा अभाव- असें या पद्धतीचें स्वरूप आहे.
 "प्रस्तुत मालेचा उद्देश" या निबंधमालेतील दुसऱ्या निबंधांत सांगितल्याप्रमाणे विष्णुशास्त्री यांना लोकांना बहुश्रुत करावयाचें होतें. लोकांमध्ये मार्मिकपणा वाढवून त्यांना विचार करण्याची सवय लावावयाची होती. कठीण पहाडांतून घाट बांधले असतां वाटसरांची जी सोय होते तीच सोय ज्ञानेच्छु लोकांसाठी करावयाची होती. ज्यास विद्यालयांतील शिक्षण न मिळाल्यामुळे ज्ञानाचा लाभ घडत नाही त्यांना ज्ञानाचा मार्ग खुला करावयाचा होता. लोकांत सदभिरुचीचा प्रसार करून त्यांच्यांत ग्रंथ वाचण्याची गोडी निर्माण करावयाची होती; आणि याचबरोबर मराठी भाषेची योग्यता किती आहे तेहि समजून द्यावयाचें होतें. त्यांच्या निबंध-रचनेचें जें वर वर्णन केलें आहे त्यावरून तीं उद्दिष्टें निबंधमालेमुळे अचूकपणे साध्य होण्यासाठी त्यांनी काय धोरण ठेवलें होतें व कसकसे प्रयत्न केले होते, हें कळून येईल.
 आरंभीं सांगितल्याप्रमाणे अशी रचना मराठीतच काय; पण भारतांतल्या कोणत्याहि प्रादेशिक भाषेमध्ये तोंपर्यंत झाली नव्हती. मराठीलाहि हा संस्कार प्रथमच घडत होता. त्या दृष्टीने त्याचे महत्त्व फार आहे. मराठी गद्याचे विष्णुशास्त्री यांना जनक म्हणतात तें यासाठीच. गद्यरचनेचें सर्वं शास्त्र त्यांना करतलामलकवत झालें होतें. त्यामुळेच त्यांचे निबंध मराठींत अमर झाले आहेत. त्यांनी ही वाङ्मयवास्तु उभारण्यासाठी कशी भक्कम चौकट उभी केली होती तें येथवर आपण पाहिलें. आता तिची सौंदर्यशोभा त्यांनी कशी वाढविली त्याचा, म्हणजेच त्यांच्या शैलीचा, विचार करावयाचा आहे.