नवभारताची निर्मिति । नऊ
या तीन थोर पुरुषांनी जें कार्य केलें, जी क्रांति भारतांत घडवून आणली तिची पूर्व-तयारी राममोहन राय, दादाभाई, लोकहितवादी, म. फुले, न्या. रानडे यांनी आधी करून ठेवली होती. कोणत्याहि क्रांतींत नव्या तत्त्वज्ञानाची, समाजरचनेच्या नव्या मूलतत्त्वांची, आवश्यकता असते. त्या तत्त्वांचा मनाशी निश्चय करून समाजांत त्यांचा प्रसार धैर्याने व दृढनिश्चयाने सतत करावा लागतो. हाच क्रांतीचा पाया होय; त्यावरच नवसमाजाचें शिल्प उभारलें जातें. भारतीय समाजांत सर्वांगीण क्रांतीची अशी पायाभरणी करणारे पहिले थोर पुरुष म्हणजे राजा राममोहन राय हे होत. पाश्चात्त्य विद्येचा प्रसार प्रथम बंगालमध्ये झाल्यामुळे नवविचारांचा उदय प्रथम त्याच प्रदेशांत झाला. राममोहन राय यांनी प्रथम रूढ हिंदु धर्मावर अत्यंत प्रखर टीका करण्यास प्रारंभ केला; कारण धर्मक्रांति झाल्यावांचून, विकृत धर्म-कल्पनांपासून समाज मुक्त झाल्यावांचून, येथे दुसरी कसलीहि क्रांति होणें शक्य नव्हतें. त्या वेळीं समाजावर सर्वंकष अशी धर्माची सत्ता होती. व्रतेंवैकल्यें, उद्यापनें हे सर्वं कर्मकांड, मायावाद शिकविणारी निवृत्ति, बुद्धिनाश करणारें ग्रंथप्रामाण्य, समष्टि-भावना मुळांतच खुडून टाकणारा जातिभेद, स्त्रीचें दास्य व त्यांतून निर्माण झालेली सतीची दुष्ट, रानटी चाल, हीं सर्व हिंदु धर्माच्या विकृतीचीं लक्षणें होत, असें राममोहन याचें मत होतें ; म्हणून धर्मसुधारणेसाठी त्यांनी ब्राह्म समाजाची स्थापना करूनं आपल्या लेखांतून, पत्त्रांतून व व्याख्यानांतून धर्माच्या या विकृतीवर सतत भडिमार चालू ठेवला होता; आणि त्याच वेळीं भौतिक विद्यांची उपासना या देशांत व्हावी, असे प्रयत्न त्यांनी चालविले होते. लॉर्ड बेकन याच्या काळापासून ज्या भौतिक दृष्टिकोनाचा अवलंब युरोपने केला त्याच दृष्टिकोनाचा अवलंब करून भारताने आधुनिक भौतिक व सामाजिक शास्त्रांचें अध्ययन केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. तो मानून भारतीय समाजधुरीणांनी अनन्यभक्तीने या पाश्चात्य विद्यांची उपासना केली, म्हणूनच त्यांना भारतांत सर्वांगीण क्रांति घडविणें शक्य झालें.
ही क्रांति घडविण्यासाठी केसरीच्या त्रिमूर्तीने जें कार्य केलें त्याचें विवेचन आपल्याला पुढील प्रबंधांत करावयाचें आहे; पण त्यापूर्वी पेशवाईच्या अंतापर्यंत भारतीय समाजाची स्थिति कशी अवनत झाली होती आणि ती सुधारण्यासाठी त्यांच्या आधीच्या समाजधुरीणांनी कसे प्रयत्न केले होते, त्याचें धोडक्यांत समालोचन करणें अवश्य आहे.
मानवत्वाची प्रतिष्ठा
गेल्या शतकाच्या पूर्वार्धात या देशांत पाश्चात्य संस्कृतीच्या आगमनामुळे जें तात्त्विक विचारमंथन सुरू झालें त्यांतून जीं अनेक तत्त्वरूप रत्नें निघाली त्या रत्नांतील अत्यंत श्रेष्ठ रत्न म्हणजे 'मानवत्वाची प्रतिष्ठा' हे होय. १८५० च्या पूर्वी अनेक शतके आपल्या देशांत जीं समाजबंधनें रूढ होतीं त्यांचें परीक्षण केलें तर असे दिसून येतें की, त्या बंधनांच्या प्रणेत्यांना मानवी जीवनाची प्रतिष्ठा मान्य