निबंधकार विष्णुशास्त्रीं । १०१
काळी भारतीयांचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न चालू असल्यामुळे, अशा तऱ्हेचा गर्व वाहणें किती अवश्य आहे तें सांगितलें आहे.
'संपत्तीचा उपभोग', 'लोकभ्रम' या निबंधांची रचना अशीच शास्त्रीय पद्धतीने केलेली आहे. संपत्तीला तुच्छ लेखूं नये. राष्ट्राच्या उत्कर्षासाठी तिचें फार महत्त्व आहे, हें त्यांचें पहिल्या निबंधांत प्रतिपाद्य आहे. तेव्हा प्रथम ती तुच्छ आहे, त्याज्य आहे असे म्हणणाऱ्यांचा पक्ष शंकराचार्य, सॉक्रेटीस व संस्कृत मराठी कवि यांच्या आधारे मांडला आहे; आणि नंतर रोम, इंग्लंड, फ्रान्स इत्यादि देशांचीं उदाहरणें देऊन उत्तरपक्ष मांडला आहे.
कार्यकारणभावाचा विचार हा युक्तिवादाचा एक प्रधान घटक होय. प्रतिपक्षाच्या सिद्धान्तामागे कार्यकारणभावाचा आधार नाही व आपल्यामागे तो आहे हे दाखविणें हा युक्तिवादाचा आत्माच होय. या युक्तीचा विष्णुशास्त्री यांनी अनेक ठिकाणी अवलंब केला आहे. संपत्तीचें महत्त्व सांगतांना ते म्हणतात, दुर्बलता, दुराचार प्रवृत्ति हे जे अनर्थ त्यांचा संपत्तीशी कार्यकारणरूप-संबंध नित्यत्वाने राहत नाही, कारण मोठी राजसत्ता भोगीत असतांना वरील विकारांपासून मुक्त असलेल्यांची उदाहरणें इतिहासांत अनेक आहेत. 'लोकभ्रम' या प्रबंधांत तर प्रामुख्याने याच पद्धतीचा त्यांनी अवलंब केला आहे. भुतें-खेतें, शकुन-अपशकुन, आकाशांतील ग्रह आणि मानवी जीवनांत येणारे शुभाशुभ प्रसंग यांमध्ये कार्यकारण संबंध कांही दाखवितां येत नाही, हें त्यांनी नाना प्रकारे दाखवून दिले आहे; आणि शेवटी म्हटलें आहे की, "हें घडतें तें काकातालीय न्यायाने घडते. यास इंग्रजीत 'असोसिएशन ऑफ आयडियाज' (कल्पनांची संगति) असें म्हणतात; आणि मनाने घेतलेल्या कारणांचा व कार्यांचा असंबंध पुष्कळदा दृष्टीस पडल्याखेरीज वरील ग्रह नाहीसा होत नाही." असें असल्यामुळे हा असंबंध ते पुनः पुन्हा प्रस्थापित करतांना दिसतात.
अन्वय- व्यतिरेकाने आपला मुद्दा सिद्ध करणें हीहि युक्तिवादांत महत्त्वाची पद्धत मानली जाते. विष्णुशास्त्री अनेक वेळा ती अनुसरतात. वक्तृत्व हे लोकसत्ताक शासनपद्धतींतच उदयास येतें, असें त्यांना सांगावयाचें आहे. त्यासाठी प्रमाणें कोणती? ग्रीसमध्ये अथेन्स संस्थानांत लोकसत्ता होती, तेथे ही कला उदयास आली. त्याच ग्रीसमध्ये स्पार्टा, थीबस, मासिडन या संस्थानांत लोकसत्ता नव्हती. तेथे कोणी मोठा वक्ता झाला नाही. इटलींत तसेंच घडलें. रोममध्येच फक्त मोठे वक्ते झाले. अन्यत्र नाही. अर्वाचीन काळांत इंग्लंड, अमेरिका या देशांत लोकसत्ताकें असल्यामुळे तेथे वक्तृत्वाचा उत्कर्ष झाला; पण आशिया खंडांत मोठमोठीं साम्राज्ये झाली तरी प्रजासत्ताक- पद्धति तेथे नसल्यामुळे तेथे तसा उत्कर्ष झाला नाही. संपत्ति ही राष्ट्राला हानिप्रद ठरत नाही व दारिद्र्य हें सामर्थ्य प्राप्त करून देत नाही हा विचार मांडतांना विष्णुशास्त्री यांनी अन्वय-व्यतिरेक प्रमाणच दिलें आहे. रोम व कार्थेज हीं संपन्न राष्ट्रें होतीं; पण तरी शेकडो वर्षे त्यांची सत्ता टिकली.