१०० । केसरीची त्रिमूर्ति
पौर्वात्य लोकं ग्रीक-रोमनांपेक्षा जास्त सुसंस्कृत होते, असें ऑक्ले म्हणतो. सिंधु-गंगा या प्रदेशांत फार प्राचीन काळीं तत्त्वज्ञान व अध्यात्म या प्रांतांत लोकांनी अत्यंत प्रगत विचार मांडले होते, असें बकलने म्हटलें आहे. नाना फडणीस, पूर्णय्या, झाशीवाली, यशवंतराव होळकर यांचा सिडने स्मिथ, मरे, टॉरेन्स यांनी गौरव केला आहे. हे मुत्सद्दी व वीर स्त्री-पुरुष युरोपियांच्या बरोबरीचे होते, असें ते म्हणतात. हिंदी शिपायांचा युरोपांत इतका गौरव होत होता की, महाराणा फ्रेडरिक म्हणाला, असे शिपाई मला मिळाले तर मी युरोप सहज जिंकीन.
ख्रिस्ती मिशनऱ्यांनी नीतीच्या बाबतींत नसती ऐट करूं नये हें सांगण्यासाठी विष्णुशास्त्री 'दि वे टु रीगेन इंडिया' या ग्रंथांतला उतारा देतात. त्याचप्रमाणे बकल, व्हाल्टेअर यांचीहि अवतरणें देतात. भारताची इंग्लिश इतिहासकार कशी विटंबना करतात हें दाखविण्यासाठी मेकॉले, मिल, मॉरिस यांचे उतारे तर त्यांनी पुनः पुन्हा दिले आहेत. काव्य-नाटकांची चर्चा करतांना तर पोप, ड्रायडन, जॉनसन, वर्डस्वर्थं, शेक्सपियर, बायरन्, कालिदास, भवभूति, भारवी, जयदेव, बाण, भर्तृहरि, आडिसन मेकॉले एडिंबरो रिव्ह्यू, वेस्ट मिनिस्टर रिव्हयू, यांच्या काव्य-नाटकांतील व टीकेतील अवतरणांचा अक्षरशः वर्षाव करतात.
कोणी तरी मेकॉलेबद्दल असें म्हटलें आहे की, त्याचे ग्रंथ वाचणें म्हणजे सर्व ग्रंथालय वाचण्यासारखेंच आहे. विष्णुशास्त्री यांच्याबद्दल तेंच अगदी यथार्थतेने म्हणता येईल. आपल्या निबंधांतून इतक्या विविध क्षेत्रांतील ग्रंथकारांचा त्यांनी वाचकांना परिचय करून दिला आहे की, ग्रंथालय-वाचनामुळे जशा त्यांच्या जाणिवेच्या कक्षा रुंदावल्या असत्या तशाच निबंधमालेच्या वाचनाने त्या रुंदावल्या.
यानंतर आता शास्त्रशुद्ध युक्तिवाद विष्णुशास्त्री कसा करतात तें पाहवयाचें आहे.
युक्तिवाद करतांना त्याची अगदी सर्वमान्य व सर्वरूढ पद्धत म्हणजे पूर्वपक्ष- उत्तरपक्ष अशी मांडणी करणें. विष्णुशास्त्री तीच अनुसरतात. मराठीला हें लेणें पूर्वी कोणी घातलें नव्हतें म्हणून त्याचें महत्त्व. 'गर्व' हा निबंध पाहा. योग्य रीतीचा गर्व हा दोषरूप नसून तो मनुष्याला शोभादायकच होतो, आणि षड्विकार हे रिपु नसून ते मित्र आहेत, असें प्रतिपादन चिपळूणकरांना करावयाचें आहे. हा अर्थातच उत्तरपक्ष होय. त्याच्या आधी प्रारंभीच पूर्वपक्षाचें मत काय आहे तें त्यांनी सविस्तर मांडलें आहे; आणि मग पूर्वपक्ष-खंडन व स्वपक्ष-मंडन केलें आहे. असें करतांना त्यांनी ग्रीक तत्त्वज्ञ सोलन, भारतीय तत्त्वज्ञ भर्तृहरि, विख्यात शास्त्रज्ञ न्यूटन, यांचीं उदाहरणे देऊन अयोग्य गर्व ते वाहत नसत, हें प्रथम सांगितलें आहे; आणि नंतर स्वपक्ष मांडतांना भवभूति, जगन्नाथपंडित, तुकाराम, मोरोपंत यांचीं अवतरणें देऊन त्यांचा गर्व त्यांना कसा शोभून दिसतो, तें दाखविलें आहे. आणि शेवटी सध्याच्या