Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निबंधकार विष्णुशास्त्री । ९९

बर्क, शेरिडन यांच्यापासून थेट ग्ल्याडस्टन, डिझरेली, ब्राइट येथपर्यंतचे वक्ते विवेचनांत येऊन जातात. 'इतिहास' हा निबंध मनांत येतांच विष्णुशास्त्री यांच्या मनांत प्रथम कोण उभा राहणार? अर्थात् ग्रीसचा हिरोडोटस. तो जगांतला पहिला इतिहासकार! त्याच्या पाठोपाठ साऱ्या जगांतला अत्युत्कृष्ट इतिहासकार थुसिडिडीस आणि तिसरा म्हणजे सॉक्रेटीसचा शिष्य जिनोफन. त्यानंतर रोमचे इतिहासकार लिव्हि, प्लुटार्क, सीझर, टासिरस आणि शेवटीं 'हल्लीच्या काळी सर्वांहून विशेष ज्ञानसंपन्न असलेले लोक म्हणजे इंग्लिश. त्यांनी तर सर्व जगांतल्या देशांचे इतिहास लिहून ठेविले आहेत! 'विद्वत्त्व आणि कवित्व' यांचे संबंध विशद करतांना ग्रीसमधील ऱ्हापसोडिस्ट, सिसेरो, इंग्लंडमधील जॉनसन, पोप, ड्रायडन, शेक्सपियर, मिल्टन यांची उदाहरणें आधार म्हणून त्यांनी दिलीं आहेत. तशीं दिल्यावांचून शास्त्रीबबांचा निबंध पुरा होणारच नाही. 'वाचना'चे महत्त्व सांगतांना पेट्रार्कची आठवण सांगितल्यावांचून सजावट पुरी होणार नाही. "पूर्व दिव्य ज्यांचें त्यांना रम्य भावि काल" हा सिद्धान्त त्यांना विशद करावयाचा आहे. त्याला प्रमाणे? होमर कवीने आकिलिसचा पराक्रम वर्णिला नसता तर शिकंदर झाला नसता. व्यासानें पांडव-चरित्र गाइलें नसतें तर शिवाजी उत्पन्न होऊन त्याने यवनांपासून राज्यश्री माघारी हरण केली असती काय? शिकंदराचा इतिहास नसता तर सीझर कशाला होता? आणि याच स्वरांत पुढे थोरले बाजीराव, चिमाजीअप्पा, थोरले माधवराव, व समशेरबहादूर गोकलखा! शेवटीं निष्कर्ष- "तेव्हा इतिहास लिहावे लागतात. ते वाचून पुढे-मागे कोणाला तरी त्यांपासून उत्साह व प्रेरणा प्राप्त होते."
 विष्णुशास्त्री यांना लोकांना विचार करावयास शिकवावयाचें होतें; पण त्यासाठीच त्यांना बहुश्रुत करावयाचें होतें. आपल्या निबंधमालेचें, लोकांस बहुश्रुत करणें हे उद्दिष्ट आहे, असें त्यांनी दुसऱ्या अंकांतच सांगितलें आहे. इतिहासांतील शेकडो घटनांचा ते जागोजागी आधार देतात. त्यामुळे हीं दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. आधार-प्रमाणांनी बोलावयाचें असतें, सप्रमाण विधानें करावयाची असतात, हा संस्कार निबंधमालेमुळे लोकांच्या मनावर सतत होत राहिला आणि अनेक देशांतील घडामोडी डोळ्यासमोर नित्य येत राहिल्यामुळे लोकांच्या जगाच्या ज्ञानांतहि भर पडली.
 हेंच दुहेरी उद्दिष्ट साधण्यासाठी चिपळूणकरांनी आपल्या प्रतिपादनाला आधार म्हणून शेकडो ग्रंथकारांची अवतरणें बहुतेक सर्व निबंधांत दिली आहेत. विचारशक्ति जागृत होण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक घटनांना जसें महत्त्व आहे तसेंच पंडितांच्या ग्रंथांनाहि आहे. एकापरीने ते ग्रंथ म्हणजे ऐतिहासिक घटनाच आहेत. भारताचा प्राचीन इतिहास अत्यंत वैभवशाली होता. आम्ही एका थोर संस्कृतीचे वारस आहों, हें त्यांना जगाला व स्वजनांना पटवून द्यावयाचें होतें. हें महासत्य त्यांनी जागजागी पाश्चात्त्य पंडितांच्या तोंडूनच वदविलें आहे. तीन हजार वर्षांपूर्वीच