Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९८ । केसरीची त्रिमूर्ति

याविषयी विष्णुशास्त्री यांनी पूर्ववयांतच कांही सिद्धान्त मनाशी निश्चित केले होते. आणि ते लोकांच्या बुद्धीला पटवून देण्यासाठीच त्यांनी लेखणी हातीं धरली होती. शिवाय त्यांना लोकांना विचार करावयास शिकवावयाचें होतें, समाजाला सज्ञानदशा आणावयाची होती. ती गद्य वाङ्मयानेच येते असें त्यांचें निश्चित मत होतें. 'इंग्रेजी भाषा' या प्रबंधाच्या अरंभींच त्यांनी म्हटले आहे की, भाषेत गद्य-ग्रंथांचा प्रचार सुरू होणें हें लोकसुधारणेचें एक मोठें चिन्ह आहे. कारण पद्य रचना सोडून देऊन गद्याकडे जेव्हा लोकांचा कल होतो तेव्हा केवळ मनोरंजन करणाऱ्या विषयांहून अधिक योग्यतेच्या विषयांकडे त्यांची मनें प्रवृत्त झालीं, असें दिसून येतें. तेव्हा ही रीत पडणें हें राष्ट्राच्या सज्ञान अवस्थेचें सूचक होय, हे उघड आहे.
 तेव्हा लोकांना विचार करावयास शिकवून, लोक-सुधारणा करावयाची, राष्ट्राला सज्ञान दशा आणावयाची हें उद्दिष्ट असल्यामुळे प्रत्येक गोष्टींत त्यांच्या तर्काला बुद्धीला आवाहन करणें हें अपरिहार्यच होतें. हें बुद्धीला आवाहन करण्याचें कार्य विष्णुशास्त्री यांनी कोणत्या साधनांनी केलें? इतिहासांतील उदाहरणें, मोठमोठ्या ग्रंथकारांची वचनें आणि तर्कशास्त्रीय युक्तिवाद, हे तीन मार्ग त्यांनी अवलंबिले आहेत. लोकभ्रम या प्रबंधाचा उपोद्घात करतांना त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याहि गोष्टीच्या खरेपणाविषयी खात्री होण्यास तीन प्रकार लागतात. एक तिची संभाव्यता, दुसरें प्रत्यक्ष प्रमाण, आणि तिसरें विश्वासपात्र मनुष्याचें भाषण किंवा लेख. ढोबळपणें पाहतां वर सांगितलेले युक्तिवाद, इतिहास व ग्रंथ म्हणजेच हे प्रकार होत. त्यांचा आपल्या निबंधांत विष्णुशास्त्री यांनी कसा उपयोग केला आहे तें पाहूं.
 इतिहास हा विष्णुशास्त्री यांचा अत्यंत आवडता विषय. या विषयाइतकें त्यांचें दुसच्या कोठल्याच विषयावर प्रेम नव्हतें. आपल्या विधानांचा विस्तार व प्रपंच ते प्रामुख्याने इतिहासाच्या आधारेंच करतात. भारताचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास हा तर त्यांनी अभ्यासलाच होता. पण त्यापेक्षाहि जास्त बारकाईने त्यांनी ग्रीस, रोम, इटली, इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया या पाश्चात्त्य देशांचा इतिहास पाहिला होता. ग्रीस व रोम यांचा इतिहास तर त्यांना जणू काय मुखोद्गतच होता. ज्यामध्ये त्यांनी ग्रीसमधील एखाद्या घटनेचा उल्लेख केलेला नाही असा त्यांचा प्रायः एकहि निबंध नसेल. वक्तृत्व हा त्यांचा प्रबंध पाहा. ग्रीस देश तर वक्तृत्वाचें आदिपीठ. आणि तेथील जगविख्यात वक्ता म्हणजे डेमोस्थेनीस. त्याच्या वक्तृत्वकलेचें साग्रसंगीत वर्णन शास्त्रीबुवांनी केलें आहे. आणि त्याबरोबरच अथेन्स या नगरीचेंहि यासंबंधीचें माहात्म्य सांगितलें आहे. त्यानंतर क्रमानेच रोम येतें. तेथील सिपियो, केटो, मारियस, सीझर आणि शेवटी डिमोस्थेनीसच्याच तोडीचा सिसेरो. त्याच्या वक्तृत्वाच्या यशाचे जे रोमहर्षक प्रसंग त्यांचें वर्णन त्यांनी तपशिलाने केलें आहे. त्यानंतरचें वक्तृत्वाचें पीठ म्हणजे इंग्लंड. तेथील चॅथम, फॉक्स, विल्यम पिट