चरित्रकार विणुशास्त्री । ९३
वगैरे निकराने कलह चालले असतां, संकटसमयीं सर्वांनी एक होणें व साऱ्या पृथ्वीभर उलाढाल चालली असतां स्वदेशाचें वारें न विसरणें या दोन गोष्टींवरून त्यांच्या स्वाभिमानाचें स्वरूप कोणाच्याहि लक्षांत येणारे आहे. शिवाय पर-राज्याची तर गोष्ट, दूरच पण स्वराजाचाहि जुलूम त्यांस सहन न होऊन त्यांनी एकाचा शिरच्छेद केला व एकास पळवून लावला व राजाचे अधिकार अगदी संपुष्टांत आणून ठेवले, व थोरापासून लहानापर्यंत सर्वास हवें तसें बोलण्याचालण्याची पूर्ण मोकळीक दिली!
विष्णुशास्त्री यांनी केलेले इंग्रजांच्या स्वाभिमानाचें हें वर्णन अतिशय मार्मिक आहे. स्वाभिमानामुळे इंग्रज ऐक्य करतात. याचा अर्थ असा की, त्यांचा स्वाभिमान हा राष्ट्राभिमान आहे, आणि ऐक्यावांचून त्या अभिमानाच्या गप्पा फोल आहेत हें त्यांनी जाणलें आहे. या स्वाभिमानामुळेच ते स्वकीय राजाचीहि अरेरावी सहन करीत नाहीत. तेव्हा त्यांचा स्वाभिमान म्हणजे लोकाभिमान आहे, आणि लोकांच्या स्वातंत्र्याचा अपहार करणारा राजा स्वकीय असला तरी ते त्याला शत्रूच मानतात. विष्णुशास्त्री यांचा कल्पना-विहंग प्रजासत्ताक राज्याची स्वप्ने पाहत असे, असें आगरकरांनी म्हटलें आहे तें किती यथार्थ आहे तें यावरून ध्यानांत येईल; आणि जॉनसनचें चरित्र लिहिण्यांत त्यांचा हेतु काय होता हेंहि स्पष्ट होईल.
प्रबोधन
या हेतूच्या सिद्धीसाठी या देशांत प्रथम विद्येचें पुनरुज्जीवन होऊन येथे युरोपांतल्याप्रमाणे प्रबोधनयुग प्रवर्तित झाले पाहिजे असें विष्णुशास्त्री यांना वाटत होते. हें प्रबोधन घडविण्याचा मार्ग कोणता? ग्रंथ-लेखन, ग्रंथ-निर्मिति. 'मराठी भाषेची सांप्रतची स्थिति' हा लेख लिहिण्यास त्यांनी लेखणी उचलली तेव्हाच, किंवा त्याच्याहि आधी 'शालापत्रकां'त ते लिहू लागले तेव्हापासून या देशाच्या उद्धाराचा ग्रंथ-निर्मिति हाच मार्ग होय हें त्यांच्या मनांत निश्चित झालें होतें. जॉनसनच्या चरित्राच्या समारोपांत त्याच्या चरित्रापासून आमच्या नव्या विद्वानांनी कोणता बोध घ्यावा हें सांगतांना त्यांनी त्यांना हाच उपदेश केला आहे.
निरपेक्ष ग्रंथ लेखन
प्रथमतः त्यांनी हे दाखवून दिले आहे की, आज आपल्या मराठी भाषेची जी स्थिति आहे तीच शंभर वर्षांपूर्वी म्हणजे जॉनसनच्या काळी इंग्रजी भाषेची होती; आणि त्या वेळी तेथील वाचकांच्या अंगींहि इकडच्या सध्याच्या वाचकांइतकीच अभिज्ञता व रसिकता होती. विष्णुशास्त्री म्हणतात, "या सादृश्यावरून एक मोठी गोष्ट वाचकांच्या लक्षांत आल्यावांचून राहणार नाही. ती ही की, इंग्रेज ग्रंथकारांच्या परिश्रमांनी ती भाषा जर आज इतक्या नावारूपास आली तर आमच्या लोकांनी तसाच उद्योग केला तर तितकें किंवा निदान त्याच्या खालोखाल तरी त्यांच्या श्रमास यश कां येणार नाही?" पण वरील सादृश्यावरून व जॉनसनच्या चरित्रावरून दुसरी एक गोष्ट एतद्देशीय ग्रंथकारांनी घेण्यासारखी आहे. ती ही की, ग्रंथ-रचनेच्या श्रमाचें