Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९२ । केसरीची त्रिमूर्ति

वितंडवादांत शिरून 'शेषं कोपेन पूरयेत्' अशी युक्ति लढविण्यासहि मागे घेत नसे. याशिवाय एखादा देश किंवा एखादी व्यक्ति यांच्याविषयी त्याचे जे कित्येक ग्रह होते त्यांचें पटलहि त्याच्या बुद्धि-चक्षूंवर प्रसंगविशेषीं येऊन ते प्रकृत विषयाचें यथावत् भान त्यास होऊ देत नसत. अमेरिकेत राज्यक्रांति झाली त्या वेळीं जॉनसनने सरकार-पक्ष उचलून धरून लेख लिहिले. हे लेख अगदीच सरासरी आहेत. त्यांत युक्तीपेक्षा भाषासौंदर्य व आवेश हेच गुण विशेषतः आढळतात. अशा रीतीने जॉनसनची बुद्धि, तर्कशक्ति, त्याची विद्धत्ता, त्याची वैचारिक सचोटी यांनाहि उणेपणा आणणारे जे दोष तेहि विष्णुशास्त्री यांनी परखडपणें सांगून टाकले आहेत.
इंग्रजांचे गुणगान
 या चरित्राच्या प्रारंभीच डॉ. जॉनसन हा इंग्लिश राष्ट्राचा प्रतिनिधिभूत होता असें विष्णुशास्त्री यांनी म्हटलें आहे; आणि चारित्रावरील शेवटच्या निबंधांत त्या विधानाचे विवरण करतांना त्याच्या अंगचे प्रधान गुण हेच इंग्लिश राष्ट्राचे प्रधान गुण कसे होते तें सांगितलें आहे. हें विवेचन वाचतांना असें ध्यानांत येतें कीं, स्वदेशाचें, स्वकीयांचें गुणवर्णन करावें तसें तशाच आत्मीयतेने, शास्त्रीबुवांनी इंग्रजांच्या गुणांचें वर्णन केले आहे. इंग्रज राज्यकर्ते, इंग्रज मिशनरी व इंग्रज पंडित यांच्यावर प्रत्येक निबंधांत, संधि सापडेल तेथे, न सापडली तर विषयांतर करून, हत्यार धरणारा हा पुरुष, आपल्या त्याच लेखणीने इंग्रजांचें मुक्तकंठाने गुणगान करतो यावर क्षणमात्र विश्वास बसत नाही. पण विष्णुशास्त्री यांच्या चरित्राचें हेंच रहस्य आहे. पाश्चात्त्य संस्कृति, पाश्चात्त्य विद्या, पाश्चात्य समाज आणि प्राश्चात्त्य व विशेषतः इंग्रज लोक, यांच्याबद्दल त्यांच्या मनांत खराखुरा आदर होता. ती संस्कृति, ती विद्या येथे आणावी व पाश्चात्त्यांचे, इंग्रजांचे गुण आपल्या लोकांच्या अंगी बाणवून, रुजवून, फार मोठें मानसिक परिवर्तन या समाजांत घडवून आणावें हेंच त्यांचें उद्दिष्ट होतें. त्यामुळे राज्यकर्त्यांवर संधि मिळेल तेथे ते जसे टीका करीत तसेच जेथे संधि मिळेल तेथे ते इंग्रजांचें गुणगानहि करीत.
 जॉनसन याच्या अंगचा पहिला गुण म्हणजे निश्चय. हा गुण इंग्रज राष्ट्राच्या ठायीं होता याचे प्रमाण काय? त्यांनी हजारो मैल दूर असलेल्या हिंदुस्थानांत येऊन, शेकडो बिकट प्रसंगांवर मात करून येथे आपले आधिपत्य स्थापन केलें हें! त्याचप्रमाणे अटलांटिक महासागरांत एका कोपऱ्यांत पडून राहिलेलें हें बेट, दोन हजार वर्षांपूर्वी कोणाला माहीतहि नव्हतें, तें आज वैभवाच्या शिखरावर चढलें आहे, व सारं जगहि त्याच्या उलाढालीस पुरेसें न होऊन विद्या, कला, कौशल्य यांचें तें केवळ माहेरघर होऊन राहिलें आहे, हा तरी वरील अमोलिक गुणाचाच प्रभाव होय!
 इंग्रजांचा दुसरा मोठा गुण स्वाभिमान. त्याचें लक्षण काय? इतर देशांप्रमाणेच त्यांच्यांमध्ये हरएक प्रकरणी परस्परांत मतभेद असतां व निरंतर राज्य-प्रकरणांत