Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९४ । केसरीची त्रिमूर्ति

साफल्य फार दीर्घकाळाने होत असतें. तेव्हा त्यांनी आमच्या या धनहीन व ज्ञानहीन देशांत ग्रंथ-रचनेपासून फलनिष्पत्ति कितपत होण्याचा संभव आहे हें जाणून मुख्यतः देशहित-बुद्धीनेच आपलें काम बजावलें पाहिजे. कोणत्याहि लाभावर नजर न देतां पहिल्याने केवळ कर्तव्य म्हणूनच त्यांनी हातांत लेखणी धरली पाहिजे; आणि या चरित्रावरून दुसराहि एक महत्त्वाचा उपदेश ग्रंथरचनेच्या संबंधाने एतद्देशियांनी घेण्यासारखा आहे. जॉनसनचे इतके ग्रंथ झाले त्यांच्या वृत्तान्तांत कोठे 'सरकारचा उदार आश्रय', 'दक्षिणाप्राइज कमिटीकडून बक्षीस' असा कांही प्रकार दृष्टीस पडत नाही. कोशासारखीं प्रचंड कामें जीं उठलीं तीं फक्त लोकाश्रयावर! तर देश-भाषांचा उत्कर्ष व्हावा अशी ज्यांची मनःपूर्वक इच्छा असेल त्यांनी वरील गोष्टींचें चांगलें मनन केलें पाहिजे.
कारणांतून कार्य
 या देश-भाषांच्या उत्कर्षांतून अंतीं काय साधावयाचें? विष्णुशास्त्री यांनी पहिला निबंध लिहिला- 'मराठी भाषेची सांप्रतची स्थिति'; आणि शेवटचा- 'आमच्या देशाची स्थिति.' तेव्हा भाषा आणि देश हे त्यांच्या मतें अविभाज्य होते. पहिल्या लेखाच्या पहिल्या कलमांतच त्यांनी लिहून टाकलें आहे की, भाषेची अभिवृद्धि ही देशाच्या उत्कर्षाचें मोठेंच साधन आहे. जॉनसनच्या चरित्रांत त्यांनी शेवटीं हा विचार अगदी स्पष्ट केला आहे. मात्र तो चरित्र-निरूपणाच्या ओघांत केला आहे. आणि त्या वेळची इंग्रजी भाषा व आजची मराठी भाषा यांच्या स्थितींत जसें सादृश्य आम्हीं दाखविलें तसेंच त्या वेळची इंग्लंडची स्थिति व आजची या देशाची स्थिति यांतलें सादृश्य येथे दाखवीत आहों, असा भास निर्माण केला आहे.
 जॉनसनच्या कारकीर्दीच्या अखेरीस अमेरिकेतील वसाहतवाले इंग्लंडविरुद्ध बंड करून उठले व इंग्लंडने धाडलेल्या सैन्याचा पराभव करून स्वातंत्र्याचा जाहीरनामा त्यांनी फडकविला. विष्णुशास्त्री म्हणतात, "युद्धांत इंग्लंडची धुळधाणी उडून एवढें राज्यचें राज्य हातचें गेलें, यामुळे राजा व प्रधान-मंडळ यांची अतिशयित नाचक्की झाली व लोकपक्षास तेज आलें. त्यांतून विल्किज्, जूनियस यांच्यासारखे लोकपक्षाचे कैवारी यांनी तर आपल्या लेखांनी लोकांस आपले हक्क पुरतेपणीं भासवून देऊन प्रतिपक्षावर सारखा धडाका चालविला होता."
 आता वरील स्थितीचें सादृश्य आमच्या देशांतहि कसें दृष्टीस पडूं लागलें आहे, तें सर्वांस माहीत आहेच. पाश्चात्त्य विद्येचा संस्कार इकडील लोकांस घडून त्याच्याबरोबर वर्तमानपत्रांचा फैलाव, लौकिक प्रकरणांची चर्चा, सार्वजनिक सभा, वगैरे प्रकारहि सहजच सुरू झाले आहेत. तेव्हा या कारणांपासून वरील कार्य (म्हणजे स्वातंत्र्याचा जाहीरनामा) उद्भवावें हें सहजच आहे. गारगोटीवर आपण होऊन जर चकमक झाडली आणि तींतून झाडण्यासरसा विस्तव पडला तर त्याबद्दल कोणास आश्चर्य वाटेल काय?