विषयप्रवेश
पाश्चात्त्य विद्या
सुमारे दीडशे वर्षांपूर्वी पेशवाईचा अस्त झाला व भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. इंग्रजांनी या देशांत पाश्चात्य विद्यांचा प्रसार केल्यामुळे गेल्या शतकांत येथे एक अभूतपूर्व क्रांति घडून आली व नवभारताचा जन्म झाला. त्यापूर्वीच्या हजार वर्षांत भारतांत असें परिवर्तन कधीच झाले नव्हतें. त्या कालखंडांत शब्दप्रामाण्य, विषमता, निवृत्ति, दैववाद अशी समाजघातक तत्त्वें धर्मशास्त्रज्ञांनी उपदेशिली, आणि समाजाने तीं अंगीकारिली होती. त्यामुळे हिंदु समाज विघटित झाला व स्वसंरक्षणाला असमर्थ होऊन बसला. मुसलमानी सत्तेचा निःपात करून हिंदूंनी शेवटी हिंदुपदपातशाहि स्थापिली हें खरें; पण पाश्चात्य लोकांच्या आक्रमणाला ते तोंड देऊ शकले नाहीत. भौतिक ज्ञानाची अवहेलना, कूपमंडूक वृत्ति, समुदगमननिषेध यांमुळे हिंदु समाज लुळापांगळा होऊन गेला होता; त्याच्यांत चैतन्य असे राहिलेच नव्हते. त्यामुळे तो इंग्रजांच्यापुढे पराभूत झाला आणि भारताच्या कपाळीं पारतंत्र्य आलें. पण त्यानंतर जी पाश्चात्त्य विद्या या देशांत प्रसूत होऊ लागली तिच्या प्रभावाने येथल्या समाजधुरीणांना नवी दृष्टि प्राप्त झाली आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे हा समाज पुन्हा जिवंत होऊं लागला. एका शतकाच्या आंतच त्याचा विलक्षण कायाकल्प झाला, आणि नवभारताचा जन्म झाला.
शिल्पकार
नवभारताच्या निर्मितीचें हें महत्कार्य करणारे जे थोर पुरुष गेल्या शतकांत महाराष्ट्रांत होऊन गेले त्यांत विष्णुशास्त्री चिपळूणकर, प्रिन्सिपॉल गोपाळ गणेश आगरकर व लो. बाळ गंगाधर टिळक यांचें स्थान फार मोठें आहे. केसरीची त्रिमूर्ति ती हीच होय. ही त्रिमूर्तीच नवमहाराष्ट्राची व नवभारताची शिल्पकार होय. मात्र