चरित्रकार विष्णुशास्त्री । ९१
सुधारणा घडवून आणीत. रात्रभर असें विधानसभेचें काम केल्यावर त्यांना थकवा येई, न्याहारी हवीशी वाटे; पण खिशांत दोन दमड्याहि सापडत नसत!
जॉनसनच्या क्लबची ही अशीच माहिती विष्णुशास्त्री यांनी मुद्दाम दिली आहे. या क्लबांत बर्क, गिबन, ग्यारिक, गोल्डस्मिथ, रेनॉल्डस, फॉक्स, सर विल्यम जोन्स असे त्या वेळेचे अनेक विख्यात पुरुष दर आठवड्यास जमत असत व इंग्रजी भाषेतील नव्या-जुन्या ग्रंथकारांविषयी चर्चा करीत असत. ती चर्चा लोकांना इतकी महत्त्वाची वाटे की, त्या सभेत ग्रंथाविषयी जो निर्णय होई त्यावर त्या ग्रंथाचें भवितव्य अवलंबून असे. मित्रपरिवाराच्या या वर्णनामुळे जॉनसनचें व्यक्तिमत्त्व अगदी स्पष्ट होतें हें सांगावयास नकोच.
निष्पक्ष वृत्ति
चरित्र ही जी ग्रंथपद्धति तिचीं कांही लक्षणें वर सांगितलीं. चरित्रनायकाच्या गुणांप्रमाणे त्याचे दोषहि दाखवून देणें, त्यांची चिकित्सा करणें हें तिचें आणखी एक महत्त्वाचें लक्षण. ती चिकित्सा करतांनाहि विष्णुशास्त्री यांना पुन्हा तसें करणें कसें योग्य आहे हें वाचकांना समजावून देणें अवश्य वाटलें. कारण ही पद्धत पूर्वी येथे नव्हती. किंबहुना दोषचिकित्सा करणें युक्त नव्हे असेंच लोकमत येथे होतें. थोर कवीच्या काव्यांतले दोष दाखविणें युक्त नाही, आपला तो अधिकार नाही, हा जसा पूर्व काळी समज होता तसाच चरित्रनायकावर कोणत्याहि कारणाने टीका करणें योग्य नव्हे, असाहि समज होता. म्हणून प्रथम दोषचिकित्सेचें समर्थन विष्णुशास्त्री यांना करावें लागलें. तें करतांना तेथे जो मुद्दा त्यांनी मांडला होता तोच येथे मांडला आहे. तो म्हणजे मानवाचें अपूर्णत्व. "दोषांचा सर्वथा अभाव हा एक परमेश्वराच्या ठायीं मात्र संभवतो. मनुष्यांत सर्वगुणसंपन्न व सर्व दोषविवर्जित असा कोणीहि नाही. यास्तव थोर पुरुषाचा गौरव जसा अवश्य तसाच त्याचा हीनपणा निष्पक्षपाती वृत्तीने सांगणेंहि जरूर आहे. अशामुळे त्या चरित्रापासून जो लाभ व्हावयाचा तो नष्ट होऊन त्याजवरची पूज्य-बुद्धि उडून जाते इत्यादि समजुती खोट्या आहेत."
अशी प्रस्तावना करून जॉनसनच्या बारीक मोठ्या सर्व दोषांचें वर्णन विष्णुशास्त्री यांनी केलें आहे. वास्तविक जॉनसनबद्दल त्यांना पराकाष्ठेची भक्ति वाटत असे. ग्रंथलेखनाच्या बाबतींत तोच त्यांचा आदर्श होता. आपल्या नव्या विद्वानांनी तोच आदर्श पुढे ठेवावा, असें त्यांनी शेवटीं आवर्जून सांगितलें आहे. तरीहि त्यांनी विभूतिपूजक वृत्ति कोठेहि दाखविली नाही. जॉनसनच्या स्वभावांतील तिरसटपणा, सुस्तपणा, आळस हे दोष तर त्यांनी दाखविले आहेतच; पण त्याच्या पांडित्याला, विद्वत्तेला व विचारीपणाला बाधक होतील अशा दोषांचेहि विवरण केलें आहे. जॉनसनची भाषणे सर्वच युक्तीस धरून असत असें नाही. कधी कधी तो वादविवादाच्या भरांत अप्रमाण गोष्टीहि बोलून जाई व आपला पक्ष खोटा आहे, असें पक्कें जाणीत असतांहि तो खरासा भासवून देण्याचा यत्न करी; कधी कधी