९५
संध्याकाळ.
[६९]
संध्याकाळ.
श्लोक.
संध्याकाळ असेः रवी उतरतो आहे समुद्रावरी,
त्याचे बिम्ब सुरेख चुम्बिल पहा लाटांस या लौकरी;
मातीला मिळुनी गळूनि पडलें तें पुष्प जाई जसें,
लोपाला लहरींत मंडलहि हें जाईल आतां तसें. १
आकाशीं ढग हे पहा विखुरले, त्यांच्यावरी सुन्दर
रंगांच्या खुलती छटा, बघुनि त्या येतें स्वचित्तावरः-
हा मृत्युंगत होतसे दिवस, तन्मस्तिष्कपिंडांवरी
येती अक्षयमोक्षसिन्धुलहरी तेजोयुता यापरी ! २
पक्षी हे घरट्यांकडे परतुनी जातात कीं आपुले,
त्यांलागीं किलबील शब्द करुनी आनन्द देती पिलें;
गाई या कुरणांतुनी परततां हम्बारवा फोडिती,
त्यांच उत्सुक वत्स त्यांस अपुल्या दीनस्वरें बाहती. ३
आनन्दी दिसती युवे, फिरकती जे या किनाऱ्यावरी,
ध्याती ते निज सुन्दरींस, गमतें, उल्हासुनी अन्तरीं;
जी ही मन्दिरराजि पैल दिसते, तीच्या गवाक्षांतुनी
झाल्या त्या असतील हृष्ट युवंती चित्तीं असें आणुनीः- ४
"अस्तालागुनि जातसे दिनमणी; रात्री अहा येतसे !
रात्री! जादु किती विलक्षण तुझे नामामधें गे वसे !
प्रेमाचें हृदयीं उषी कुमुद जें संकोच गे पावलें
देसी त्यास विकास !-चित्त म्हणुनी नाथाकडे लागलें !" ५