Jump to content

पान:केशवसुत यांची कविता.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९२


केशवसुतांची कविता.


[६६]


मयूरासन आणि ताजमहाल.


श्लोक.

कामें दोन सुरेख त्या नृपवरें केलींः- मयूरासनीं

ज्या तो बैसुनि शोभला; प्रथम तें, सा कोटि ज्या लागले,

राजे ज्यापुढते जुळूनि अपुल्या हस्तद्व्या वांकले,

झाले कंपित, तत्करीं शिर असे, येऊनियां हें मनीं;

प्रेमें मन्दिरही तसें निजसखीसाठीं तयें लावुनी

कोटी तीनच, त्या गभीर यमुनातीरावरी बांधिलें !

चोरें आसन तें दुरी पळविलें ! स्मर्तव्य कीं जाहलें !

आहे अद्भुत तो महाल अजुनी तेथे उभा राहुनी !

विल्हेवाट अशीच रे तव कृती त्या सर्वदा पावती;

मत्त भ्रान्त नरा ! सदैव कितिही तूं धूप रे जाळिला

स्वार्थाच्या प्रकृतीपुढें-निजमनीं ही याद तूं जागती

राहूं दे-तरि धूर होइल जगीं केव्हांच तो लोपला !

काडी एकच गन्धयुक्त, नमुनी प्रीतीस तूं लाव ती,

तीचा वास सदा जगीं पसरुनी देईल तो तुष्टिला !


१३ नोव्हेंबर, १८९२.


[६७]

चिरवियुक्ताचा उद्गार.

श्लोक.

वृष्टींमागुनि चन्द्रकान्तिधवला ती ये शरत् साजिरी,

तैसा रम्य वसन्त तीव्र शिशिरामागूनि तो येतेस,