Jump to content

पान:केशवसुत यांची कविता.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९१


'पण लक्षांत कोण घेतो ?' च्या कर्त्यास.


[६५]


'पण लक्षांत कोण घेतो ?' च्या कर्त्यास.


श्लोक


यूरोपीय कथा-पुराण-कविता-ग्रन्थांतुनी चांगले

ते आहेत कितीक थोर उमदे राऊत वाखाणिले;

ज्यांचें बीद-पवित्र राहुनि, जगीं दुष्टांस दण्डूनियां

कीजे सन्तत मुक्त दुर्बल जनां, मांगल्य वाढावया ! १


या त्यांच्या बिरुदामुळेंच बहुधा, सन्मान ते जाहले-

देते या महिलाजनांस पहिला; स्त्रीवर्बकायीं भले-

ते भावें रतले, क्षणक्षण मुखें स्त्रीनाम उच्चारुनी;

भूष्पृष्ठस्थित आद्य दैवत जणूं त्यां वाटली भामिनी ! २


'आहे रे पण कल्पनारचित हें सारेंहि वाग्डम्बर,'

हें कोणी व्यवहारमात्रचतुर प्राणी वदे सत्वर !

'नाहीं ! -वाचुनि हें पहा !' म्हणुनि मी तूझी कथा दावितों,

गेले राउत ते न सर्व अजुनी ! -हा गर्व मी वाहतों ! ३


धीरा ! उन्नतिचे पथांत उमदा राऊत तूं चालसी !

नाहीं काय ? करूनि चीत अगदीं ही रूढिकाराक्षसी

टांकानें अपुल्या दुराग्रह जुना मर्मीं तसा विंधुनी

स्त्रीजातीस असाच काढ वरती ! -घे कीर्ति संपादुनी ! ४