Jump to content

पान:केशवसुत यांची कविता.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९०


केशवसुतांची कविता.


आशामेघालि चिन्तानल अजि विझवूं जाहलीसे तयार,

शब्दांनो ! मागुते या ! बहर मम मनीं नूत्ने येईल फार ! ४


सप्टेंबर, १८९२.


[६४]


दिवा आणि तारा.


श्लोक.


ताऱ्याला जमिनीवरूनि वदला गर्वें दिवा हें असेंः

"अस्पष्ट द्युति ही किती तव ! तुझा रात्रौ कितीसा असे-

लोकाला उपयोग ? मी, बघ कसा तेजा निजा पाडितों,

अंधारीं व्यवहार सर्वहि जगीं माझ्यामुळें चालतो !" १


तारा तो वरुनी दिव्यास वदला गम्भीर शान्त स्वरेंः-

"दीपा ! तूं म्हणतोस तें कवण तो लेखील खोटें बरें ?

जी वस्तुस्थिति ती परन्तु बघतां आहे जरा वेगळी,

अंधारावर तूझिया मम नसे बा! योजना जाहलीः २


"भांडीं, तीं मडकीं, डबे,-ढकलिसी अंधार यांपासुनी,

ब्रम्हांडांस परन्तु मी उजळितों, गेलीं युगें होउनी;

तेजानें वरुनी दिव्या ! खुलविसी तूं मानवी चेहरे,

आत्मे उज्ज्वल आंतले पण गड्या ! होतात माझे करें ! ३


"ज्ञाते, आणि भविष्यावादिहि, कवी, ते चित्रकर्ते तसे,

मत्तेजें फिरतात, अन्य जन हे तूझ्या प्रकाशें जसे;

तूझ्यासंनिध जो कवी लिहितसें त्यालाच तूं पूस रे-

'दीपाच्या लिहितोस तूं द्युतिबलें कीं तारकाच्या बरें ?" ४


२६ सप्टेंबर, १८९२.