पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 उद्योजकतेचे इतर काही अनुभव

 आपण ज्यांच्या उद्योगाची तोंड ओळख आत्तापर्यंत करून घेतली अशासारखी अजूनही काही उदाहरणं नक्कीच देता येतील. त्यातल्या काहींची प्रातिनिधिक स्वरूपात आपण ओळख करून घेतली. पण प्रातिनिधिक म्हणताना हे सगळे आर्थिकदृष्ट्या यशस्वी उद्योग म्हणून याकडे पाहिलेलं नाही. हे प्रतिनिधी निवडताना इतरही काही मुद्दे डोळ्यासमोर होते. उदाहरण द्यायचं तर त्या व्यक्तीची शैक्षणिक, कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती? व्यवसायाची निवड कशा प्रकारे केली आहे, प्रबोधिनीकडून कोण-कोणत्या स्वरूपाची मदत यांना मिळाली, किती प्रकारचे प्रयत्न उद्योग चालविण्यासाठी केले - अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून हे प्रतिनिधी आपण निवडले.

 यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योजक आहेत ते शिवापूरच्या कृषितांत्रिकमध्ये प्रशिक्षित झालेले. तांत्रिक शिक्षण आणि स्वत:चा उद्योग सुरू केल्यावर जॉब अशा दोन्ही गोष्टी त्यांना प्रबोधिनीकडून सुरुवातीस मिळाल्या. ससेवाडीतल्या चंद्रकांत वाडकरांसारख्यांनी त्याचा फायदा घेऊन मग स्वत:च्या कौशल्याची भरही घातली. ऑफसेटच्या व्यवसायात दिवसाला जास्तीत जास्त प्लेट तयार करण्याचं कौशल्याचं काम त्यांनी केलं. लेथची ३ यंत्रे खरेदी केली. ४-५ कामगार तयार केले. महिन्याला ७ ते १५ हजारापर्यंत उलाढाल ते या उद्योगांतून करत होते. मंदीच्या काळात मात्र त्यांना हा उद्योग सावरता आला नाही. वेळूगावच्या संजय घाटे यांनीही याच प्रकारे उद्योग उभा केला पण मंदीमुळे तेही यशस्वी होऊ शकले नाहीत.

 कर्ज योजनेचा लाभ -

 काहींनी प्रबोधिनी संस्थेकडून कर्जयोजनेतून लाभ घेतला आणि ती रक्कम शेतीसाठी योग्य प्रकारे वापरली. सांगवी- ता. भोर इथले श्री. नरेंद्र लोळे हे त्यापैकी एक. त्यांची ११ एकर शेती आहे. त्यांनी ९६ साली नांगरटीसाठी कर्ज घेतलं आणि त्यांचं ज्वारी, भात इ. मालाचं उत्पन्न नेहमीपेक्षा दुप्पट झालं. त्यातून पुढचं भांडवल वाढलं. कुसगाव इथल्या राधिका कृष्णा वाशिवले यांनी बचत गटातून ९६-९७ मध्ये कर्ज उचललं. ते त्यांनी क्रेन आणण्यासाठी वापरले. विहीर खोदायची क्रेन त्यांचे मालक चालवतात. दोन वर्षांत त्यांनी कर्जफेडही केली. तर कुसगावच्याच गुणाबाई पर्वती मांढरे यांचे मालक रिक्षा ड्रायव्हर आहेत. त्यांनी गाडी खरेदी आणि गाडी दुरुस्तीसाठी कर्ज वापरलं.

 वरवे-खुर्द इथल्या रहिवासी लीलाबाई मुरलीधर बुरडे मोठ्या जिद्दीच्या. त्या गावाकडे एकट्या रहातात. शेतीची सगळी कामं स्वत: बघतात. त्यांचा नवरा, मुलगा, सून सगळं कुटुंब नडगावला राहतं. बचत गटातून कर्ज

जिद्द जागवू गाऊन गाणी - मिळून साऱ्या जणी    ३4