पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांना काम येतं. या निमित्तानं गटातल्या, गावातल्या बायांची सोय झाली.

 हे काम नीराताई आपल्या घरातच करतात. त्यांना वाटतं की बाहेर जावून १० ते संध्याकाळी ६ पर्यंत काम करून दिवसाचा २५-३० रुपये रोज घेण्यापेक्षा घरातल्या घरात राहून जास्त पैसे या उद्योगात मिळू शकतात. पण अर्थातच घरातलं काम झाल्यामुळे त्याला वेळेचं बंधन रहात नाही तर लागेल तितक्या वेळेला काम करण्याची तयारी ठेवावीच लागते. मग दिवसाला २०० ते २५० रुपयांपर्यंतही काम मिळतं. शिमग्यापासून पावसाळ्याच्या आधीपर्यंत कांडपाचं काम चालू रहातं. म्हणजे वर्षातले ६ महिने हा व्यवसाय व्यवस्थित चालू रहातो. या कामात कॉलेजात शिकणारे संदीप आणि योगेश हे सुद्धा त्यांना मदत करतात.

 नफ्या-तोट्याचा हिशोब -

 कुठलाही उद्योग करायचा तर त्याचा हिशोब करून किंमत ठरवणं महत्त्वाचं आहे. नीराताईंनी असाही विचार केलाय. भाव असा पाहिजे की आपल्याला परवडायलाही हवं आणि इतर गावातल्या भावांशी त्याचा ताळमेळही हवा. त्यामुळे आपल्याला येणारा खर्च, लाईटबील, भांडवल या बरोबर पुणे, नसरापूर इथला भाव या सर्व बाबींचा विचार करूनच निराताईंनी किलो प्रमाणे आणि धान्याप्रमाणे भाव निश्चित केला आहे.

 उद्योग विस्तार -

 पैशाची ओढाताण होत असल्यामुळे नीराताईंनी हाताखाली कामाला कुणी घेतलं नाही. यंत्रावरचं काम, हिशोब, आवरणं सगळं त्याच करतात. आजूबाजूच्या गावात आणखीही कांडप यंत्रे आहेत. त्यामुळे उद्योग वाढवायचा कसा? असा प्रश्न आहे. एखाद्या कंपनीबरोबर हेच काम करता आलं तर या उद्योगाची व्याप्ती वाढेल म्हणून त्यांना कंपनीचं एकदम मोठं काम घ्यायची इच्छा आहे.

***

प्रेरणेत, प्रवृत्तीत, विचारात - उद्योजकता    ३३