पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घेऊन त्यांनी मुलाला दुकान चालू करून दिलं. मांगदरी इथल्या सौ. वैशाली विनायक देशपांडे आणि सौ. रंजना बाळासाहेब मारणे यांनी बचतगटातून आपल्या असलेल्या व्यवसायासाठी कर्ज योजना वापरली. त्यांचं रेशनचं दुकान आहे.

 प्रशिक्षण वर्गाचा लाभ -

 कातवडीच्या ताराबाई आबाजी आल्हाट यांचं आयुष्य मुंबईला गेलं. तिथे त्यांनी भाजीपाल्याचा उद्योग काही वर्ष केला. नोकरीही केली. ऐकून ऐकून गिऱ्हाईकाशी बोलून त्यांना हिंदी थोडीशी इंग्रजी भाषाही येते. आता त्या गावातच राहतात. पण पेन्शन पुरत नाही म्हणून त्यांना उद्योग करावा असं वाटतं. प्रबोधिनीच्या प्रशिक्षण वर्गात शिकून त्यांनी मेणबत्त्या करायला सुरुवात केली. ४-५ वेगवेगळे आकार, वेगवेगळे रंग वापरून त्यांनी स्वत: मेणबत्त्या तयार केल्या पण हा व्यवसाय अजून जम धरत नाही. तो स्वत:च्या पायावर उभा करण्यासाठी त्यांना मदत हवी आहे.

 उद्योजकता प्रशिक्षण वर्गातून उद्योग सुरू केल्याचं आणखी एक उदाहरण आहे वेल्हे इथल्या सौ. उषा गायकवाड आणि पद्मा गायकवाड यांचं. त्यांनी खडू तयार करण्याचा व्यवसाय निवडला. मागासवर्गीयांना मिळणाऱ्या व्यावसायिक कर्जातून त्यांनी भांडवल उभं केलं. गावातल्या इतर काहींना हे तंत्र शिकवलं. ११ जणींनी मिळून काम सुरू केलं. दिवसाला २ ते ३ हजार खडू त्या तयार करतात. माल विकण्याच्या दृष्टीने त्या स्वत: तालुक्याच्या गट विकास अधिकाऱ्यांना भेटल्या व त्यांच्या मदतीने तालुक्यातल्या शाळांमध्ये खडू पाठवले. मात्र बिलांची वसूली नीट होऊ न शकल्यामुळे त्यांना काम पुढे चालू ठेवण्यात अडचणी येत आहेत.

 प्रबोधिनीच्या कामामध्ये मदत -

 बचतगट, उद्योजकता प्रशिक्षण वर्ग यातून निर्माण झालेले काहींचे संबंध पुढे अधिक दृढ झाल्याचीही उदाहरणे यामधे आवर्जून सांगितली पाहिजेत.

 या विविध योजनांचा लाभ घेत असतानाच 'घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे' - अशी गोष्ट घडली. प्रबोधिनीकडून घेता घेता काहींनी प्रबोधिनीचं इतरांना देण्याचं ब्रीदही घेतलं आहे. अनेकांनी प्रबोधिनीच्या उपक्रमांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली आहे. ज्याप्रमाणे शालनताई तळेकर प्रशिक्षण वर्गामधे शिकवतात. तर

ध्येयपूर्तीसाठी हवी निश्चित योजना.    ३५