पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/३६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 शिवण कलेतून उद्योगाचा पाया -

 साधारण ८५ साली स्टेट बँकेकडून कर्ज घेऊन शालनताईंनी व्यवसाय सुरू केला. शिवण येत होतंच. तेच उद्योग म्हणून त्या करू लागल्या. बायकांसाठी त्या मशिनवर कपडे शिवायला लागल्या. दररोज साधारण ६-७ तास म्हणजेच जवळ जवळ नोकरीच्या वेळा इतकंकाम त्या करतात. हमरस्त्यावर दुकान असल्यामुळे गावातल्याप्रमाणेच परगावचीही गिऱ्हाईक येतात. सणासुदीच्या वेळेला, परगावाच्या गिऱ्हाईकांकडून चांगला फायदा मिळतो.

 आपल्या अंगच्या या कलेचा उपयोग त्या इतरांसाठीही करतात. ज्ञान प्रबोधिनी संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिवणवर्गात त्या शिकवतात. फक्त आपल्या गावातच नाही तर कातवडीला किंवा दुसऱ्या गावातही त्यांनी शिवणवर्गात मुलींना शिकवलं आहे. यातून त्या आपल्याप्रमाणेच गावातल्या इतर मुलींनाही उद्योगाची वाट दाखवून देत आहेत.

 एकातून दुसऱ्या उद्योगाकडे -

 वाढत्या घराबरोबर गरजाही वाढायला लागतात. एखादा उद्योग असला तरी त्यातून मिळणारं उत्पन्न अपुरं वाटायला लागतं. म्हणून शालनताईंनी २ वर्षांपूर्वी बचत गटातून ५००० रुपये कर्ज उचललं आणि घरातंच आणखी एक व्यवसाय चालू केला. त्यांनी भाजीपाल्याचं दुकान चालू केलं. त्यांच्या बरोबरीनं मग चहाही चालू केला. घर रस्त्यावर असल्याच्या दृष्टीनं ह्या उद्योगांची निवड बरोबर ठरली.

 पतीचं सक्रीय सहकार्य-

 शालनताईंचे पती गावाचे कोतवाल आहेत. घरची पाऊण एकर शेती आहे. त्यात थोडा गहू, भात ते घेतात. या कामांव्यतिरिक्त ते स्वतः दुकानासाठीही मदत करतात. भाजीपाल्याची पुण्याहून दर २ ते ३ दिवसांनी खरेदी करतात. नसरापूरहून इतर सामानाची खरेदी करतात. ते स्वत:ही दुकानावर उभे राहतात. चहा तयार करून देतात. अशाप्रकारे 'एकमेकां साह्य करू' या तत्त्वावर दांपत्य आपले छोटेखानी २/३ उद्योग, शेती आणि घर सांभाळत आहेत.

***

यंत्र, तंत्र हेच उद्योगाचे मंत्र.    ३१