पान:काश्मीर वर्णन.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६६ )

झालेल्या अस्वलाचा पाठलाग करणें मोठें धोक्याचें काम आहे. कारण तो प्राणी मोठा लबाड असल्यामुळे केव्हां केव्हां एकाद्या कड्याच्या आड राहतो आणि शिकारी खालून जाऊं लागला ह्मणजे मोठमोठाले दगड त्याच्या आंगावर लोटून देतो. सिंद व लिदार या दोन नद्यां- मधील प्रदेश महाराजांनी शिकार करण्याकरितां राखून ठेविला असल्यामुळें त्यांत अन्य लोकांस ती करण्याची परवानगी नाहीं.
 या शिवाय चित्ता, रानडुकर, वनगाय, सांबर, शामवा ( रानबकरा ), मृग, लांडगा, याक ( बैलासारखा एक पशु) इत्यादि श्वापदांची शिकार करितात. दाट झाडींत व सरोवरांवर निरनिराळ्या जातींच्या पक्ष्यांचीही शिकार पुष्कळ मिळण्यासारखी आहे. पण ती फार करीत नाहींत. नद्यांत व सरोवरांत मासे पुष्कळ असून त्यांची शिकार बरीच करितात. येथें फार मोठा मासा चार पांच शेर वजन भरतो. माशांच्या शिकारीचे मुख्य दिवस जून, जुलई व आगस्ट हे महिने होत. बर्फाची चिलीम. - या देशांतील शिकारी व रानांत फिरणारे लोक बर्फाचा लहान एक गोळा घेऊन त्याच्या मध्यभागा पर्यंत एका बाजूनें भोंक पाडतात आणि त्या भोंकाशीं काटकोन होऊन त्यास जाऊन मिळेपर्यंत वरच्या बाजूनें दुसरें भोंक पाडितात. नंतर पहिल्या मोंकांत तंबाखू घालून त्यावर अनि ठेवतात आणि दुसऱ्या भोंकास तोंड लावून चिल- मीप्रमाणे ओढूं लागतात. याप्रमाणें पांच सात झुरके घेतले ह्मणजे ती चिलीम उष्णतेनें वितळून जाते किंवा फुटते. केव्हां पहिला दम घेतला नाहीं तोंच फुटते.