पान:काश्मीर वर्णन.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४७ )

रममाण होऊन जात असतां वारंवार असा विचार मनांत येई की, ह्या दिवसांत जर या देशाची वनश्री एवढी मनोरम दिसत आहे तर तिच्या उत्साहाच्या दिवसांत (वसंतकालांत) जेव्हां ती आपल्या सर्व अलंकारांनी विभूषित होते, तेव्हां तिची शोभा किती अवर्णनीय दिसत असेल ! शेवटीं आमचे मनांत अशी कल्पना आली कीं, सृष्टिजन्य सर्व संपत्तीनें पूरित जी आर्यभूमि तिचा हा देश केवळ मुखचंद्र असल्यामुळे त्यास मुख्य शोभा देणारें जें कुंकुम त्याचें हें जन्मस्थान आहे. येथील सृष्टीसौंदर्यांत अशी कांहीं मोहक शक्ति आहे. कीं, तें किती वेळ पाहत राहिलें तरी मनाची तृप्ति ही कधीं होतच नाहीं. हें सृष्टिसौंदर्य पाहून सर्व शक्तिमान् जो परमेश्वर त्याजविषयीं ज्याचें मन लीन होणार नाहीं, असा शून्य हृदयी कोण आहे! हें सौंदर्य अवलोकन करून अंतःकरण रममाण होत असतां स्विट्झरलंड, इतलीस्काटलंड. या देशांतील सर्व प्रकारच्या सृष्टिसौंद- र्यांचा हा आपणापुढें जसा काय चित्रपटच मांडिला आहे असा यूरोपियन् प्रवाशांस भास होत असेल. येथील प्रमाणें अति सुंदर देखावा सर्व यूरोपांत आपण कोठें पाहिला नाहीं असें सर रिचर्ड टेंपल आपल्या ग्रंथांत ह्मणतात. आतांएवढेच सांगतों कीं, अशी अप्रतिम वनश्री पाहण्याची ज्यांस इच्छा असेल त्यांनी या भूस्वर्गी जाऊन ती पहावी ह्मणजे त्यांची इच्छा परिपूर्ण होईल. असो. या पर्वताच्या आग्नयेस दीड मैलावर मेरूवर्धन स्वामि नांवाचें विष्णूचें एक जुनें देवालय आहे. मेरूवर्धन हा पार्थ राजाचा मंत्री होता. त्यानें हें बांधिलें असें ह्मणतात.