पान:काश्मीर वर्णन.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९ )

सोडले. वाटेने गरी, हट्टी, व चागोटी,हीं गांवे लागली. आजरोजी मार्गाने वनश्रीची जी नानाविध रूपे आमच्या पाहण्यांत आली त्यांचे वर्णन करावे तितके थोडेच होणार. आपला जन्म भूस्वर्गी होऊन पुढे ही अधोगति प्राप्त झाली अशा विचाराने अति दुःखित व लज्जायमान होऊन रुदन करीत दृष्टिआड होण्याकरितां वांकडी तिकडी वळणे घेऊन वाहणारी वितस्ता, मातेस भेट्न तिच्या दुःखाचे सांत्वन करावे अशा इराद्याने निवाकडे न पाहतां पर्वतांवरून उड्डाणे घेत येणारे लहान मोठे प्रवाह, त्यांस आडवू पाहणारे नगवाहू, या दोहोंच्या संघट्टणापासून उत्पन्न झालेल्या फेनयुक्त लाटा, त्यांचा भयप्रद पण मनास आनंद देणारा कलकलाट, हिरव्यागार शेवाळाने शोभा पावलेले नदीचे तटाक, त्यांच्या वरच्या बाजूस आरक्त व हरितपणनीं विभूषित झालेल्या वृक्षराज़ी, त्यांस सप्रेम आलिंगन देणाच्या पुष्पलता, इत्यादि सृष्टिसौंदर्य अवलोकन करीत पुढे जावे तो मार्ग चढता लागून डावे बाजूस दुःखाने व लाजेने आड झालेली वितस्ता खोल दऱ्यात कृश व पांढरी झालेली पुनः दिसू लागते. उजवीकडे पहावे तों भोंवतालच्या पर्वतांचे आपण मालक आहों असे दाखविण्याच्या बुद्धीनें तेथील जमीनदारांनी त्यांच्या माथ्यावर बांधलेल्या गळ्या, त्यांच्या भोंवतीं त्या जमीनदारांच्या आश्रयास राहणाच्या गरीब लोकांच्या लहान झोंपड्या, त्यांतून निघून वर मेघमंडळास भेटावयास जाणारे धुराचे लोट; झोंपड्यांच्या भोंवतालची कमोदादि धान्यांची त्यांची हिरवीगार शेते, त्यांतून खेळविलेले पाट, हीं पाहून आणखी काही पुढे जावें