पान:काश्मीर वर्णन.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२०)

तो एकाद्या उंच पर्वताच्या तुटक्या कड्यावरून संतापानें भयंकर शब्द करीत खालीं येणारा धबधवा दिसूं लागतो. अविचारानें उडी टाकल्यामुळे आपल्या देहाची हजारों शकलें उडाली असें जाणून तो ती एकत्र करून एकाद्या दरीतून शांतपणी वाहू लागतो. ही त्याची दुर्दशा पाहून त्याजवरील दोऱ्यांचा पूल थरथरा कांपूं लागतो. तेव्हां त्याजवरून जाणाऱ्या वाटसरांची अगदी पांचावर धारण बसते. त्या धबधब्याच्या आश्रयाने चालणारी पानचक्की तर घेरी आल्याप्रमाणे गरगरा फिरू लागते. खाली प्रवाहाच्या बाजूस गरीब लोक आपली जाडीभरडी भाकरी खात बसत, आणि तो धबधबा,दोऱ्यांचा पूल, व पानचक्की यांची मौज पाहत राहत.त्यांचें तें रमणीय स्थल, तेथील स्वच्छ हवा, आणि तें गोड व निर्मल पाणी यांचा ते सुखोपभोग घेत असलेले पाहून आमच्या मनांत हेवा उत्पन्न होत असे. वर सांगितल्या जातीच्या चक्कया या देशी पुष्कळ ठिकाणी आहेत. त्यांची रचना सोपी आहे. त्यांच्या साह्याने गहू दळतात. याच मासल्याची पानचक्की आह्मी नाशिकाजवळ गोदेच्या काठी पाहिली. व तेथेंही तेंच काम चालू होतें. असो. पुढे मार्ग उतरता लागला. वितस्ता आमच्या जवळून वाहूं लागली. पलीकडच्या बाजूस एक लहानशी पुष्करिणी दिसली. ती कमलें व पुष्पवेलींनी शोभायमान झाली असून तिच्या काठी कांही सुंदर पक्षी मंजुळ स्वरांनी गायन करीत होते. याप्रमाणें ज्यांची आमांस पूर्वी कल्पना नव्हती असे एकाहून एक विशेष रमणीय देखावे पाहत आह्मी अस्तमानीं