पान:काश्मीर वर्णन.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७९ )

तीस परीक्षकांपैकीं असून राजौरी येथील मांडलिक राजाचा मंत्री होता. देवधर यास भागवताचार्य ह्मणत. यानें गृह्यसूत्रावर टीका लिहिली आहे. प्रख्यात मीमां- सक जीं (जें ) दुक, त्रैलोक्य व श्रीगुन्न; महान् वैय्या- करणी नागजनकराज, आनंद नांवाचा नैय्यायिक, कन्होजच्या राजाकडून आलेला वकील मुहल; श्रीगर्भ व त्याचे पुत्र मंडनश्रीकंठ; रम्यदेव व त्याचा पुत्र लोष्टदेव, अलकदत्त व त्याचा शिष्य कल्याण हे परीक्षक होते. राजास पुष्कळ स्त्रिया असणें हा एक या देशी नियमच झाल्यासारखा होता. त्यास अनुसरून या राजास बहुत राण्या होत्या. त्यांत रत्नादेवी ह्मणून अति रूपवति व उदार स्त्री होती. तिनें रत्नपूर नांवाचें गांव वसविलें. रड्डा झणून दुसरी मोठी चतुर राणी होती. तिला पुष्कळ पुत्र होते, त्यांतील वडिलाचें नांव गुल्हण होते. हा सात वर्षांचा असतांच राजानें त्यास लाहोरच्या गादीवर बसविलें. असा तो सुलक्षणी वगुणी होता. या राजाच्या वेळी कल्हण हयात असून येथपावेतों कथाभाग त्यानें लिहिला असल्यामुळे राजा, त्याच्या राण्या, त्याचे सचीव व यावेळी घडलेल्या दुसऱ्या उलाढाली यांचें अतिशय वर्णन दिले आहे. याच्या मागून परमाणू, बंदिदेव, भोप्यदेव, त्याचा बंधु जस- देव, जगदेव, संग्रामदेव, लक्ष्मणदेव, सिंहदेव, सिं- हदेव (दुसरा), रिंचण व त्याची पत्नि कोटाराणी हीं अनुक्रमें गादीवर बसली. यांत भोप्यदेव हा पहिल्या प्रतीचा अविचारी व जडमति होता. एके वेळी तो एका जलाशयाच्या कांठी बसून वेडीं वांकडी तोंड़े