पान:काश्मीर वर्णन.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७२ )

नांवाचा ग्रंथ तयार केला पण त्याची भाषा कठीण असून तो संक्षेपरूपानें लिहिला असल्यामुळे लोकांच्या पसंतीस उतरला नाहीं. तेव्हां राणीच्या सांगण्यावरून सोम- देवानें क्षेमेंद्राप्रमाणे सोप्या भाषेत लिहून त्यास कथा - सरित्सागर हें नांव दिल्याचें वर सांगितलेच आहे. कलश नांवाचा या राजाचा पुत्र असून तो मोठा दुर्गुणी होता तरी राणीचा फार लाडका होता. तिनें त्यास राज्यावर बसविण्यास राजाचें मन वळविलें. पण या कामी त्याचे मंत्री हलधर व रणादित्य हे प्रतिकूळ असल्यामुळे त्यांनी ह्या कृत्याचा पश्चात्ताप करावा लागेल ह्मणून राजास सांगितलें. तथापि राणीच्या आग्रहामुळे आपल्या राज्यकारकीर्दीच्या बेविसावे वर्षों राजानें-
 कलश यास गादीवर बसविलें. राजा कलश चंद्रापीडाप्रमाणे मोठा शूर असून त्यानें परराज्यांवर अनेक स्वाऱ्या करून त्यांत जय मिळविले. पण क्षमा, नीति, पितृभक्ति इत्यादि गुणांचा त्याच्या अंगीं अभाव होता असें झणण्यास हरकत नाहीं. राज्यपद प्राप्त होतांच प्रथम त्यास आडवे येणाऱ्या दोन्ही मंत्र्यांचा त्याने नाश केला. स्त्रियांच्या संबंधानें व दुसऱ्या गोष्टींत तो इतका गैर रीतीनें वागूं लागला कीं, त्याचें वर्णन आमच्याने करवत नाहीं. पुत्राचें हें दुराचरण पाहून राजा अनंतदेव फार खेद करूं लागला. इकडे सुनांचा उत्कर्ष व उर्मटपणा पाहून राणी सूर्यवतीसही फार वाईट वाटूं लागलें. पुढें पितापुत्रांत मोठे वैम- नस्य पडून दोघांत लढाई होण्याचा प्रसंग आला होता. पण तो राणीच्या मध्यस्थीनें कांहीं काळ टाळला गेला.