पान:काश्मीर वर्णन.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १५० )

आला होता. मातृगुप्त नांवाचा एक कवि अत्यंत दरिद्री असून देवाची परिक्षा पाहण्याकरितां विक्रमा- दित्याजवळ चाकरीस राहिला. त्यानें एक वर्षपर्यंत राजाची खडतर चाकरी केली, तरी त्याला त्यानें कांहीं दिलें नाहीं; यामुळे मातृगुप्त फार उदास झाला होता, पण विक्रमादित्याने त्याचे अत्युत्तम गुण पाहून त्याचें कल्याण करण्याचा निश्चय केला होता. राजानें काश्मीर देश अराजक आहे असें जाणून गुप्तपणें आपले दूत तेथील प्रधानाकडे पाठविले आणि आपण ज्या मनुष्याला पत्र देऊन पाठवीन त्या मनुष्याला गादीवर बसवावें अशी आज्ञा केली. नंतर मातृगुप्ताला एक लखोटा देऊन तो फोडून न पाहण्याविषयों शपथ घालून काश्मीरास पाठविला. राजाने आपल्याविषयी काय केले आहे, तें न समजल्यामुळे मातृगुप्त या वेळीं फार दुःखित झाला होता. तरी वाटेंत चांगले शकून झाल्यावरून त्याला उमेद आली. काश्मीरांत जाऊन प्रधानांस लाखोटा देतांच त्यांनी मोठा सन्मान करून त्यास गादीवर बस- विलें. त्या वेळीं मातृगुप्ताला अतिशय आनंद झाला आणि राजा विक्रमादित्याच्या औदार्याची त्यानें फार तारीफ केली. मातृगुप्तानें फार उत्तम प्रकारानें राज्य केलें. त्यानें पुष्कळ विद्वान् लोकांना आश्रय दिला. भर्तृमेट नांवाच्या कवीनें “हयग्रीवनध" नांवाचें काव्य करून त्याला अर्पण केलें, त्या वेळी मातृगुप्तानें त्याला मोठी देणगी दिली. त्यानें मातृगुप्तस्वामी नांवाचें मंदिर बांधलें. याशिवाय पुष्कळ ब्राम्हणांस अग्रहार दिले. याप्रमाणें त्यानें सुमारें पांच वर्षे काश्मीरचें राज्य केलें.