पान:काश्मीर वर्णन.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १३७ )

त्यांनी वरील काल स्थापित केला असावा असे वाटतें. शिवाय राजतरंगिणींत अमुक राजानें अमुक वर्षे राज्य केलें असे जे आंकडे दिले आहेत, ते सर्व घेऊन त्यांची जुळवा जुळव करून पाहूं लागलें असतां तोही मेळ बरो- बर पडत नाहीं व कांहीं स्थळीं कविसंप्रदायास अनु- सरून निवळ अतिशयोक्ति केलेली दृष्टीस पडते; करितां कोठें राजतरंगिणीत दिलेलीं व कोठें पाश्चात्य विद्वानांनी ठरविलेलीं वर्षे आम्ही पुढील कथावर्णनांत देत आहों.

राजतरंगिणी हा ग्रंथ महावंशो ( लंका द्वीपाचा पाली

भाषेंतील इतिहास ) प्रमाणें चार कवींनी निरनिराळ्या काळी लिहिला आहे. यांतील प्रथम भाग कल्हणानें आरंभापासून तों इ० स० ११४८ पर्यंत ह्मणजे सुमारें ३८५० वर्षांत या देशांत जे राजे जाहले त्यांची कथा वर्णिली आहे. जयसिंहाभ्युदय नांवाचा ग्रंथ याच कवीनें केला अशी काश्मीरांत दंतकथा आहे. याच्या बापाचें नांव चंपक असून तो या देशांतील एका राजाचा मंत्री होता. कल्हणानें प्रथम भाग शालीवाहन शकाच्या अकराव्या शतकाच्या अखेरीस लिहिला. या भागाचे आठ तरंग आहेत. दुसरा भाग जोनराज नांवाच्या कवीनें लिहिला आहे, यास राजावली असें नांव दिले आहे. यांत इ० स० १९४८ पासून १४१२ पर्यंतची कथा दिली आहे. नंतर जोनराजाचा श्रीवर पंडित नांवाचा एक शिष्य होता, त्यानें तिसरा भाग लिहिला व त्यास आपल्या गुरूनें दिलेलें नांव ( राजा- वली ) पुढे चालविलें. यांत सुमारें ६५ वर्षांची कथा दिली आहे. चवथा भाग प्राज्यभट्ट नांवाच्या कवीनें