पान:काश्मीर वर्णन.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १३६ )

कथा मुख्यत्वें वर्णिलेली असल्याचें समजतें. राजतरंगिणी हा ग्रंथ पद्यात्मक आहे. त्यांतील कथा कलियुगाच्या आरंभापासून तो अकबर बादशहानें हा देश काबीज | केला, येथपर्यंत दिली आहे, ह्मणजे अजमासे पांच हजार वर्षांची आहे. या स्थलीं अजमा म्हणण्याचें कारण एवढेच कीं, कलियुगाचा आरंभ कधीं झाला व कौरव पांडव हे कोणत्या कालीं होते, याविषयीं आपल्या व पाश्चात्य देशाचे विद्वान् यांत एकवाक्यता नाहीं, इतकेंच नव्हे पण काश्मीर देशीं जे राजे जाहले, त्यांतील कांहींच्या कालाविषयीं पाश्चात्य विद्वानांतही किती मत- भेद आहे, तो पुढे एक दोन स्थली दर्शविला आहे. | आमच्या लोकांच्या मताप्रमाणें कृष्णावतार कलियुगाच्या आरंभी जाहला. या गोष्टीस सुमारें पांच हजार वर्षं | होत आलीं. कृष्ण व जरासंघ यांजमध्ये जेव्हां युद्ध प्रसंग चालू झाला, तेव्हां काश्मीरचा पहिला राजा गोनंद हा जरासंघाच्या मदतीस जाऊन त्यानें मथुरा शहरास वेढा घातला, असें राजतरंगिणीत लिहिले आहे. ह्यावरून गोनंद हा कृष्णाचा समकालीन असून त्यास होऊन पांच हजार वर्षे होत आलीं असें सिद्ध होतें. पण पाश्चात्य विद्वानांच्या मताप्रमाणें तो इसवी शकाचे पूर्वी ११०० वर्षे जाहला, ह्मणजे त्यास होऊन सुमारें तीन हजार वर्षे जाहली. येथे दोन हजार वर्षांची चूक पडते. ही ढोबळ चूक कशी भरून काढावी तें आम्हांस समजत नाहीं. तत्रापि आमच्या प्राचीन गोष्टींस होईल तितकें अर्वाचीनत्व देण्याचा बहुतेक पाश्चात्य विद्वानांच्या बुद्धीचा कल दिसतो आणि या कलास अनुसरूनच