पान:काश्मीर वर्णन.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १०० )

रोग इत्यादि आजारांवर मोठें वस्ताद औषध आहे. या झज्यांचें पाणी प्राशन केल्यानें व त्यांत स्नान केल्यावर सांगितलेले आजार नाहींसे होतात. येथें आजारी लोकांस राहण्यास जागा व त्यांस स्नान करण्यास न्हाणीघरें बांधण्याचा येथील सरकार विचार करील तर लोकांवर मोठे उपकार होतील. त्यांतील

अवंतीपूर- हें गांव श्रीनगरापासून १७ मैलांवर

वितस्तेच्या उजव्या तीरीं आहे. हें शहर अवंतीवर्मा नांवाच्या राजानें स्थापिलें. त्या वेळी काश्मीर देशाची वसति ३०,००,००० असून तो मोठा भरभराटीत होता. या राजानें अनेक देवालयें बांधिली होती. अवंतिस्वामी व अवंतीश्वर देवालयांचे जे अवशिष्ट भाग सांप्रत दृष्टीस पडतात, त्यांवरून या देशांत शिल्पकला किती उंच दशेस पोहोंचली होती, याचें अनुमान सहज करितां येतें. पहिलें देवालय राजानें गादीवर बसण्या- पूर्वी बांधिले व दुसरें राज्यपद मिळाल्यावर त्याच्या शेजारी बांधिलें. पहिल्याचा प्राकार १७२ फूट लांब व १४६ फूट रुंद आहे व दुसऱ्याचा १९१ फूट लांब व १७१ फूट रुंद आहे. अवंतीपूर पैकी एक मोठा चौक व त्याच्या भोवतालचा तट यांचे अवशिष्ट भाग मात्र आतां दिसतात. येथून अजमासे आठ दहा मैलांवर बिजविहार किंवा विद्याविहार (ज्ञानमंदिर ) नांवाचें अगदीं मोडकळीस आलेले एक गांव आहे, याच्या जवळ नदीवर एक लहानसा पूल असून त्याजवरून आसमंतांतील भांगाचा देखावा मोठा रमणीय दिसतो. त्याची तसबीर सर रि० डेंपल यांनी आपल्या पुस्तकांत दिली आहे.