पान:काश्मीर वर्णन.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुष्पवाटिकेतील व वेली प्रफुल्लित होऊन रमणीय दिसत असतां, शेंकडों कारंजांचे फवारे चोहोंकडे उडत असतां, त्यांवरून शीतल व सुगंध वायु वाहत असतां, दल सरोवरावरील सौंदर्याचा चित्रपट पुढें पसरला असतां, जहांगीर बादशाह आपल्या प्रियेचें मधुर गायन ऐकत तिच्याशी विलाससुखाचा उपभोग घेत असे व केव्हां केव्हां उभयतांचा प्रेमयुक्त लाडझगडा उडत असे. या सर्व विषयांवर मुर नांवाच्या प्रसिद्ध इंग्लिश कवीनें फार सुरस कविता लिहिली आहे. ती पाहण्याची ज्यांस जिज्ञासा असेल, त्यांनी लालारुखा नांवाचा ग्रंथ वाचावा. हिंदुस्थानचे लाट साहेब किंवा त्यांच्या सारिखे दुसरे बडे पाहुणे हा देश पहावयास येतात, तेव्हां हा बाग शृंगारून त्यांत चिराकदान करितात आणि सर्व कारंजी चालू करितात; त्या वेळी हे स्थळ किती रम्य दिसत असेल याची कल्पना वाचकांनीच करावी. साहेब लोक व दुसरे श्रीमान् लोक या बागेत वनभोजनें करितात किंवा चार दिवस मौजेनें येऊन राहतात. जहांगीरचा मुलगा जो शहाजहान यानें याच नांवाचा व याच नमुन्यावर लाहोर येथें एक बाग तयार करविला आहे. तो किंवा सर रि० टेंपल यांनी या देशांतील कांहीं विशेष स्थळांच्या तसबिरी आपल्या पुस्तकांत दिल्या आहेत, त्यांत या बागेचीही तसबीर दिली आहे; ती पाहिली असतां हें स्थळ किती रम्य आहे, याची कल्पना वाचकांस करितां येणार आहे. ही बाग पाहून निशात् नांवाची दुसरी बाग या सरो- वराच्या कांठी पूर्वेस आहे ती पहावयास गेलो. तिच्या भोंवत दगड आणि विदा यांचा एक तट बांधिला आहे.