पान:काश्मीर वर्णन.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ९५ )

सज्जा राखिला असून त्याजवर बहुकोनी मनोन्यासारखी एक सुरेख इमारत बांधिली आहे. ही काळ्या संगमरवरी दगडांची असून तिजवर पाहण्यासारिखें कुसर काम केलें आहे. सज्ज्याच्या खालच्या बाजूस पुष्पवाटिका, हौद व त्यांत शेंकडों कारंजी बांधिली आहेत. खजिने व हौद यांचें काम काळ्या संगमरवरी दगडांप्रमाणे चमकतें. त्यांच्या दोहोंबाजूस नयनांस आनंद देणाऱ्या वृक्षराजी लाविल्या आहेत. या बंगल्याच्या पृष्ठभागाच्या पर्वतांतील प्रवाह धरून त्याचें पाणी नळाने सर्वांत उंच अगर पहिल्या बंगल्याच्या खजिन्यांत आणून सोडिलें असून तोच नळ पुढें चवथ्या बंगल्याच्या खजिन्यास नेऊन मिळविला आहे. वर सांगितल्याप्रमाणें या बागेतील बंगल्याची रचना असून सर्वांत उंच बंगल्यांतील कारंजी चालू केली ह्मणजे त्यांच्या पाण्याचा जोत नळामार्ग. लहानशा धबधब्याप्रमाणें खालच्या तीनही बंगल्यांतील हौदांत येऊन पडूं लागतो. तोंच जसें काय त्यास भेट- ण्याच्या बुद्धीनें बंगल्यांतील सर्व कारंजी एकामागून एक उडूं लागतात. सर्वांत उंच किंवा मागील बंगल्यांत जनानखान्यांतील स्त्रिया आणि राजकन्या चैन मारीत रहात असत. वसंत ऋतूंत चंद्रमा आपल्या किरणांनी दवरूप अमृताचें वरून सिंचन करीत असतां, त्याचा तारागण आकाशास रत्नजडित करून चमकत असतां, बाजूंचीं हिमाच्छादित शिखरें मधून मधून दृग्गोचर होत असतां, त्यांजवरील प्रवाह अस्फुट व मधुर शब्द करीत खाली उतरत असतां, बागेभोंतालच्या वृक्षराजी आपल्या कोमल व आरक्त पल्लवांनी शोभायमान झाल्या असतां,