मुक्काम श्री वाराणसी
ता० जानेवारी १८७२.
ज्ञानप्रकाशकर्ते महाराज: -
वि० वि०. वारणासंगमाकडील प्रदेशाची माहिती लिहितो.
गंगा आणि वरुणा ह्या दोन नद्यांचा संगम वाराणशीच्या ईशान्य सीमेवर झाला आहे. ह्या वरुणा संगमी एकवार स्नान ज्या प्राण्याला घडतें तो सकल पातकापासून मुक्त होतो असे सांगितले आहे. पंच तीर्थीच्या यात्रेत भागीरथीच्या तटाकी ज्या पांच ठिकाणीं श्राद्धे करावी लागतात त्यांपैकीं वारणासंगम हें एक ठिकाण आहे. म्हणून जेव्हां यात्रेचा मेळा जमतो तेव्हां येथे श्राद्ध व स्नान करणारांची मनस्वी भीड होते. पंचक्रोशीची यात्रा करते वेळीही वरुणासंगम हें स्थल मोठे महत्वाचें आहे.
वाराणसीतून मणिकर्णिका घाटापासून यात्रेकरी प्रथमतः आशी संगमाकडे ह्मणजे काशीच्या दक्षिणेकडे जाऊन मग सगळी प्रदक्षिणा संपली म्हणजे ईशान्येकडून वारणासंगमावरून प्रदक्षिणा संपवितात. वरुणा संगमी गंगेच्या तटाकी चार देवालये आहेत. त्यांत देवदर्शनास जाण्याची सरकार हुकमाने बंदी आहे. सन १८५७ इसवीत ह्या देवळांचे अधिपत्य ज्याकडे होते तो फितुरी लोकांस सामील झाला आणि त्याने ह्या देवालयांतून बंडखोर लोकांच्या टोळ्या जमूं दिल्या. तेव्हांपासून सरकाराने ती सगळी देवालये आपल्या ताब्यांत घेऊन बंद करून ठेविलीं. पुढें कांही दिवसांनी ती खुली करण्यास परवानगी दिली असून पुनः काय कारणाने बंद केली हा पुरता शोध लागला नाहीं. ही सर्व देवालये शंभर वर्षांमागे शिंद्याच्या