पान:कार्यशैली.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२. बोलण्याची गाडी


 चंद्रकांत सलग बोलत राहतो. धाड धाड एखाद्या स्टेशनवरून न थांबता स्वत:च्या गुर्मीत सुसाट वेगानं जाणारी मालगाडी असते ना तसा. मालगाडी बरं, पॅसेंजर गाड़ी नाही. कारण पॅसेंजर गांडी जाताना निदान खिडक्यांतून दिसणारे रंग आणि हलणारी जिवंत माणसं तरी दिसतात. पण चंद्रकांतची असते मालगाडी. कुठेही जिवंतपणा नाही. असते फक्त धाड धाड गती आणि आपल्या बोलण्याचा प्रवास संपवण्याची आंतरिक घाई.
 कुठेही पॉज नाही. कुठेही चढउतार नाहीत, कुठेही स्मितरेषा नाही, एखादं टाकणं टाकल्यासारखं बोलणं, चंद्रकांत कितीही चांगलं, योग्य आणि खरं बोलत असला तरी त्याच्या अशा बोलण्यामुळे तो त्याला जे म्हणायचं आहे, जे सांगायचं आहे ते पोचवूच शकत नाही.

 बोलण्यात पॉज असावेत, गती शांत आणि लोकांना समजेल अशी असावी. लोकांचा रिस्पॉन्स काय येतो हे पाहत राहण्याची सवय असावी. त्यानुसार बोलण्याची पद्धत असावी. मात्र दुर्दैवाने या कुठल्याच गोष्टीचा स्पर्श चंद्रकांतता झालेला नाही. खरं पाहता या सर्व गोष्टी त्यानं शाळेत शिकायला हव्यात. पण शाळेत लिहिण्याची परीक्षा होते, मी आता चंद्रकांतसाठी 'बोलावं कसं' हे शिकवणारी शाळा शोधतो आहे.

कार्यशैली।६