पान:कार्यशैली.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१. प्रेरणा


 कामाची शैली आपोआप येत नाही किंवा कामाच्या शैलीचं उसनं अवसानही आणता येत नाही. शैली अंगात भिनावी लागते, मुरावी लागते. आपल्याला कशासाठी जगायचं आहे आणि जगणं आपण कशाला म्हणतो त्यावर शैली अवलंबून असते.
 याच संदर्भात बऱ्याण्ड रसेल यांनी लिहिलेला एक उतारा नुकताच वाचनात आला. 'मी जगलो कशासाठी' या प्रश्नाचं उत्तर देताना बर्टाण्ड रसेल यांनी त्यांच्या जीवनाचं मूलभूत सूत्र सांगितलं आणि त्या सूत्रावरूनच रसेत आपलं आयुष्य कसं जगले असतील हे समोर येतं.
 रसेल म्हणतात की माझं आयुष्य ठरवणाऱ्या माझ्या मुख्य तीन प्रेरणा होत्या. पहिली म्हणजे प्रेमाची तहान, दुसरी प्रेरणा म्हणजे ज्ञानाची भूक आणि तिसरी म्हणजे माणसाला ज्या यातना भोगाव्या लागतात त्यापासून त्याला मुक्त करण्याची एक आंतरिक धडपड, प्रेम, ज्ञान आणि मानवतेची पूजा. या तीन प्रेरणांनी बर्टाण्ड रसेल यांचं आयुष्य कसं असेल ते मी ठरवलं.

 मी विचार करत राहिलो. आपल्या जगण्याच्या प्रेरणा कोणत्या? श्रीमंत होणं की ज्ञानी बनणं, कीर्ती मिळविण्याची दिगंत इच्छा की चांगलं दिसावं ही प्रेरणा, वाटलं माझ्या कार्यशैलीच्या मूळाशी या मूलभूत प्रेरणा आहेत. कार्यशैली हा एक दृश्य परिणाम आहे. पण त्याचं कारण आहे माझ्या जगण्याविषयीच्या माझ्या मूलभूत प्रेरणा.

५. कार्यशैली