या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उणीदुणी काढण्यात रस वाटू लागला. नवी उभारी हरवली, स्वत:ला पणाला लावणारे कमी झाले, माणसं अधू झाली, बाहेरचे नवे वारे त्यांनी ओळखले नाहीत. धडाडीच्या, सळसळत्या उत्साहाला आमंत्रण देण्याऐवजी सुस्त, बद्ध नोकरशहांच्या कोरड्या, मस्तवाल हातात सूत्रं गेली. त्या सर्व हातांनी एक एक करून संस्थेची कबर खणत आणली.
मला आठवतंय याच संस्थेच्या आवारात एका झाडाखाली रोमन साम्राज्याच्या अस्ताची कारणं आम्ही बोललो होतो. आज त्याच संस्थेचा अस्तही मी पाहतो आहे. वाटलं, एकट्या-दुकट्याच्या कार्यशैलीला उत्तम संस्थेच्या व्यवस्थेचं कोंदण मिळायला हवं. आपण सर्वांनी अशा सोनेरी संस्था आपल्या सर्वांच्या भल्यासाठी टिकवायला हव्यात.
६३ । कार्यशैली