४६. राजदरबारातला वकूब
कित्येक कर्तबगार माणसांना राजदरबारातलं शहाणपण नसतं, वकूब नसतो. म्हणून केवळ ते मागे पडतात असा माझा समज आहे. राजदरबारातलं शहाणपण म्हणजे शिष्टाचार, मानवी संबंधांमधील खुबी आणि तरबेज जनसंपर्क.
त्यामुळे होतं असं की फक्त गुणी माणसालाच बढती मिळते असा प्रकार होत नाही.'गुणी' पेक्षा योग्य माणसाची निवड केली जाते. त्यामुळे सध्याचा जग-व्यवहार असा आहे की चार चांगल्या गुणांबरोबर शिष्टाचाराच्या दोन गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत, तुम्हाला माणसं अचूक ओळखता आली पाहिजेत आणि उत्तम जनसंपर्काचं एक अद्भुत जाळं तुमच्याकडे असलं पाहिजे. हे करायचं असेल तर काही गोष्टी आत्मसात करायला हव्यात. उत्तम निरीक्षण क्षमता हवी. तुमचं स्वतःवर अफाट प्रेम हवं. कुणाला काय आणि का आवडतं हे तुम्हाला माहीत हवं. लोकांना तुमच्याशी बोलायला आवडावं, असं तुमचं वागणं हवं आणि हे सर्व करण्यासाठी तुमच्याकडे एक उदात्त हेतू आणि एक योजना हवी - सर्वांना पुढे नेईल अशी.