४५. सोनेरी संस्थांचं कोंदण
या संस्थेत मी पंचवीस वर्षांपूर्वी आलो होतो. त्या काळात भारतभर नाव असलेली ही संस्था पुन्हा बघताना एखाद्या जर्जर रोग्याला आपण पाहतो आहोत, असं वाटत होतं. पंचवीस वर्षांपूर्वी या संस्थेत नुसतं जायला मिळालं तरी आम्हाला आनंद व्हायचा. रोज कुठल्या ना कुठल्या विषयावर तिथं परिसंवाद व्हायचे. रात्र रात्र तिथं वादविवाद चालायचे आणि सतत सगळ्या वातावरणात चैतन्यमयी सळसळ असायची. ती संस्था म्हणजे सदा पेटलेला ज्ञानयज्ञच आहे असं वाटायचं.
या संस्थेचा जन्मकाळ आणि भराभराटीचा काळ मी पाहिलेला होता. आता त्याच संस्थेला जर्जर, वठलेल्या अन् रोगी अवस्थेत पाहावं लागत आहे.
का झालं बरं असं? कशामुळे या संस्थेला अशी अवस्था आली? त्याच संस्थेच्या प्रांगणात फिरताना मनात प्रश्न उमटत होते, फिरता फिरता जुन्या आठवणी मनात दाटून येत होत्या.
मला जे चित्र दिसलं ते असं संस्थेच्या उच्च, भरभराटीच्या काळात संस्थेला स्वार्थी माणसं चिकटली. खुशमस्कन्यांचं राज्य सुरू झाले. गट पडले, तंटे वाढले. माणसांना कामापेक्षा एकमेकांची